वादळी वा-यासह गारपीट
By Admin | Updated: April 11, 2015 01:44 IST2015-04-11T01:44:29+5:302015-04-11T01:44:29+5:30
संत्री, लिंबू, टरबूज, बिजवाई कांदे, आंबे भुईसपाट; लाखोंचे नुकसान.

वादळी वा-यासह गारपीट
मंगरुळपीर : तालुक्यातील वनोजासह शेलूबाजार परिसरात ९ एप्रिलच्या दुपारी ४ ते ६ दरम्यान जोरदार गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. सुसाट वार्यामुळे वनोजा येथील शेतकर्यांच्या शेतातील संत्री, लिंबू, आंबा तसेच टरबूज आदी फळपिकांचे लाखोंचे नुकसान झाले. बर्याच ठिकाणी मोठे वृक्ष विजेच्या खांबांवर पडल्याने आठ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. वनोजासह शेलूबाजार येथे घरांवरील टिनपत्रे वादळी वार्यामुळे उडून गेली. ती गोळा करताना नागरिकांची तारांबळ उडाली होती. तालुक्यातील वनोजा, शेलूबाजार भागात गुरूवारी दुपारी ४ ते ६ वाजताच्या सुमारास गारपिटीसह वादळी पाऊस झाला. यामुळे वनोजा येथील कमलाबाई वसंतराव राऊत, वैशाली सुनील राऊत व सुनीता अरविंद वैराळे यांच्या २२ एकरांतील जवळपास १७00 झाडांवरील संत्री जमिनीवर आली, तर काही झाडे उन्मळून पडली. प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३0 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वनोजा येथील गजानन रामभाऊ राऊत यांच्या एक हेक्टरवरील लिंबाची संपूर्ण फळे झडून जमिनीवर सडा झाला. सोबतच सुशीलाबाई राजेंद्र राऊत यांच्या एक हेक्टर शेतातील टरबुजाचे नुकसान झाले. सोसाट्याच्या वार्यामुळे दोन घरांची पडझड झाली. तालुक्यातील तपोवन येथील शरद येवले यांच्या शेतातील बिजवाई कांदय़ाचे हजारोचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बदलेल्या वातावरणामुळे फळबागधारक शेतकरी चिंतेत सापडले होते. ९ एप्रिलच्या वादळी पावसामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले. हाताशी येणारी पिके गेल्याने शेतकरी पार खचून गेला आहे. खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यामुळे सोयाबीनसह सर्व पिकांच्या उत्पादनात मोठी घसरण आली. झालेले नुकसान रबी हंगामातून भरून काढण्याचे स्वप्न शेतकर्यांनी बाळगले; मात्र निसर्गाचा प्रकोप चालूच आहे. नापिकीची नुकसानभरपाई हाती पडली नसतानाच निर्सगाची बळीराजावर वक्रदृष्टी पडली. शिरपूर, रिसोड तालुक्यातील वसारी, दापुरी, केशवनगर, मसला, भरजहागिर व किनखडा येथेही वादळ वार्यासह पाऊस बरसला. यामध्ये आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मालेगाव व रिसोड तालुक्यात शुक्रवारी ३.३0 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. सावरगाव जिरे परिसरात तुरळक गारांचा पाऊस झाला. वाशिम येथे १0 एप्रिलला रात्री ८ पासून जोरदार पावसास सुरुवात झाली.