गुरूंप्रती शिष्यांनी व्यक्त केली कृतज्ञता !
By Admin | Updated: July 31, 2015 00:57 IST2015-07-31T00:57:42+5:302015-07-31T00:57:42+5:30
उच्चपदस्थ अधिका-यांनी व्यक्त केली गुरूजनाची महती.

गुरूंप्रती शिष्यांनी व्यक्त केली कृतज्ञता !
वाशिम : 'गुरू'.. हा दोन अक्षरी शब्द.. मात्र, दोन पिढय़ांना पुरून उरेल; एवढे वास्तववादी जीवनाच्या अनुभवाचे गाढोडे या शब्दात दडले आहे. जीवनाला खर्या अर्थाने दिशा देणार्या गुरूजींशिवाय जीवनच नाही, अशा शब्दात जिल्ह्यातील प्रशासकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकार्यांनी आपल्या गुरूजणांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
समाजात 'आदर्शवत' स्थान असणार्या गुरूवर्यांच्या विश्वासार्हतेवर अलिकडच्या काळातील काही वाईट घटनांमुळे प्रश्नचिन्ह लागले आहे; तर दुसरीकडे आदर्शवत गुरूवर्यांंच्या छत्रछायेखाली अनेकांनी शून्यातून विश्वही निर्माण केले आहे. गुरूजींच्या नि:स्वार्थ शिकवणीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो, अशी प्रांजळ कबूली जिल्ह्याच्या प्रशासकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकार्यांनी मोठय़ा अभिमानाने देत गुरूजींच्या शिकवणीला सलाम केला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर, जिल्हा क्रीडा अधिकारी करण बोरवडेकर, शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) दिनेश तरोळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास पेंदोर यांच्यासह अन्य सरकारी अधिकार्यांनी जीवनात गुरूजनांचे जीवनातील महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट केले.
गुरूपौर्णिमा दिनाच्या पूर्वसंध्येला ३0 जुलै रोजी वाशिम जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकार्यांना त्यांच्या विद्यार्थीदशेत गुरूजणांची शिकवण कशी होते, याबाबत 'लोकमत'ने बोलते केले असता, प्रत्येकाने गुरूजींची महती शब्दबद्ध करताच येत नसल्याचे ठामपणे सांगितले. कुणी आई-वडिलांना प्रथम गुरू मानले तर कुणी पुस्तक, संदर्भग्रंथाला गुरू मानून आयुष्यात चांगले यश मिळवले, असे मत व्यक्त केले. आयुष्याला उजाळा देणारी ज्योत म्हणूनही अनेकजण गुरूंकडे पाहतात. गुरू हा खर्या अर्थाने मानवाचा मित्र, मार्गदर्शक, कर्ताधर्ता, तत्त्ववेत्ता असतो. गुरू या शब्दात प्रचंड सार्मथ्य, प्रेरणास्त्रोत, आदर, कृतज्ञता दडली आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक निमित्त म्हणून गुरूपौर्णिमा दिनाकडे पाहिले जाते.