गुटख्याचा ‘काळाबाजार’
By Admin | Updated: May 20, 2014 22:42 IST2014-05-20T22:02:54+5:302014-05-20T22:42:55+5:30
राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाने लागु केलेल्या गुटखाबंदीच्या पदराआड लाखोंच्या गुटख्याचा काळाबाजार फोफावत चालला आहे.

गुटख्याचा ‘काळाबाजार’
वाशिम : राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाने लागु केलेल्या गुटखाबंदीच्या पदराआड जिल्हाभरात लाखोंच्या गुटख्याचा काळाबाजार फोफावत चालला आहे. जिल्ह्यातील काही वितरकांनी गुटख्यासह पान मसाल्याची मोठय़ा प्रमाणात साठेबाजी केलेली असुन चढय़ा भावाने त्याची विक्री सुरू आहे. तथापि, सदर साठेबाजीला आळा घालण्याचे नवे आव्हान अन्न व औषध प्रशासन विभागा समोर उभे ठाकले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सद्यस्थितीत वाशिमसह अकोला जिल्ह्यातील जवळपास २४00 व्यापार्यांना परवाने दिले आहेत. तर ३000 लघु व्यावसायिंकाची नोंदणी आहे. यापैकी बहुतांश व्यापार्यांचा गुटखा व पान मसाला विक्रीचा व्यवसाय आहे. प्रत्येक दुकानदाराकडुन दिवसाकाठी गुटख्याचे पाच ते सहा पुडे विकले जातात. साधारणपणे एका पुड्यात ५५ पाकीटे येतात. गुटख्याच्या या विक्रीतून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होते. यामध्ये सुमारे २0 टक्के विक्रेत्यांला नफा मिळतो. शासनाने गुटख्यावरच बंदी आणल्यामुळे यातून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी काही विक्रेत्यांनी परप्रांतातून गुटखा व पान मसाला आणून त्याची साठेबाजी सुरू केली आहे. सद्या साठा करायचा आणि वारेमाप किमतीने चोरी चोरी छुपके छुपके या गुटख्याची विक्री करायची असा या विक्रेत्यांचा डाव सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागासमोर सदर साठेबाजीला आळा घालण्याचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. साठेबाजी न रोखल्यास काळाबाजाराला उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.