‘बर्ड फ्लू’ संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:14+5:302021-02-05T09:27:14+5:30
वाशिम जिल्ह्यामध्ये स्थित ठिकाणी एखाद्या पक्ष्याला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यास ते ठिकाण ज्या गावात स्थित असेल, त्या ...

‘बर्ड फ्लू’ संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी
वाशिम जिल्ह्यामध्ये स्थित ठिकाणी एखाद्या पक्ष्याला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यास ते ठिकाण ज्या गावात स्थित असेल, त्या गावाच्या शिवारात व गावास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येते. अशा प्रतिबंधित क्षेत्रातून जिवंत अथवा मृत पक्षी बाहेर नेता येणार नाही. अशा पक्ष्यांचे मांस, अंडी, खाद्य पोल्ट्री, मॅन्युर, लिट्टर, पक्ष्यांची त्वचा, पक्ष्यांचे मृत शरीर किंवा पक्ष्याचा कोणताही भाग, त्यासंबंधी कोणतीही वस्तू किंवा बाब प्रतिबंधित क्षेत्राबाहेर नेता येणार नाही. त्याची वाहतूक करता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात पक्षी एकत्र जमवता येणार नाहीत, त्यांचे प्रदर्शन भरविता येणार नाही.
लागण झालेल्या पक्ष्यांना व त्या संपर्कातील पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्यात यावी. या पक्ष्यांची विल्हेवाट लावताना जमिनीमध्ये ५ फूट खड्डा खोडून त्यामध्ये चुना टाकावा, त्यानंतर पक्ष्याला टाकावे. त्यावर परत चुना टाकून खड्डा बुजविण्यात यावा. बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्ष्यांना मार्केट, बाजार, सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रतिबंधित क्षेत्रात त्याला नेता येणार नाही. लागण झालेल्या पक्ष्यांच्या वाहतुकीच्या आधी व नंतर सदर वाहनाची व जागेची जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.