बटाट्यावरील करपा रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:44 IST2021-01-16T04:44:58+5:302021-01-16T04:44:58+5:30
विविध पिकांवरील किडी आणि त्यांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कीटकनाशक शास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी उपक्रम सुरू केला आहे. ...

बटाट्यावरील करपा रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
विविध पिकांवरील किडी आणि त्यांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कीटकनाशक शास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी उपक्रम सुरू केला आहे. त्यात बटाटा पिकावरील करपा रोग, त्याचे प्रकार आणि व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन त्यांनी केले आहे. बटाटा पिकावर प्रामुख्याने दोन प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यात उशिरा येणारा करपा हा रोग फायटोप्थोरा इन्फेस्टन्स या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे बटाटे मलूल होऊन काढणीपूर्वी कुजतात. रोगाची बुरशी म्हणजे रोगग्रस्त बटाटे जमिनीत सुप्तावस्थेत राहतात आणि यानंतर पाऊस वारा आणि पाण्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो, तर लवकर येणारा करपा हा रोग अल्टरनेरिया सोलेनी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेले बटाटे साठवणुकीत सडतात. बटाट्याच्या उत्पादनात घट येते. रोगकारक बुरशी बटाट्यात जमिनीत सुप्तावस्थेत राहते. यानंतर हवा पाणी यामार्फत या रोगाचा प्रसार होतो. या रोगावर नियंत्रणासाठी टोमॅटो पिकानंतर बटाटा पीक घेणे टाळावे तसेच पिकांचा फेरपालट करावा, लागवडीसाठी रोगमुक्त बियाण्याचा म्हणजे रोगमुक्त बटाट्याचा वापर करावा, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रोगप्रतिकारक जातीचा वापर लागवडीसाठी करावा, पीक तणविरहित ठेवावे, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच योग्य निदान करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खालीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची निर्देशित प्रमाणात फवारणी करावी आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा बुरशीनाशक बदलून १५ दिवसांनी फवारणी करावी, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.