लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गतवर्षी राज्यभरात शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा या किडीपासून कपाशीचा बचाव करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर कृषीतज्ज्ञ आणि शेतकºयांच्या सभा घेण्यात येणार आहेत.
बोंडअळीचे तीन प्रकार आहेत. यामध्ये अमेरिकन बोंडअळी (हिरवी अळी), ठिपक्याची बोंडअळी आणि शेंदरी बोंडअळीचा समावेश होतो. बीटी बियाण्यांची क्षमता कमी झाल्याने या अळीचा गतवर्षी कपाशीवर प्रकोप दिसून आला. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात ३० हजार हेक्टरवरील कपाशी बाधित झाली आणि शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. या नुकसानीसाठी शासनाकडून आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात आली असली तरी, या अळीचे नियंत्रण आवश्यक असल्याने यंदा कृषी विभाग याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या अंतर्गत बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीला पिक पेरणीनंतर महिनाभरात कोणती किटकनाशके फवारावी, शेंदरी बोंडअळीचा प्रकोप झाल्यानंतर कोणती किटनाशके फवारावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी काय उपाय करावेत, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर कृषीतज्ज्ञांकडून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहेच शिवाय तालुक्यातही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.