भूगर्भातील जलस्तर घटला!
By Admin | Updated: November 29, 2014 23:44 IST2014-11-29T23:44:14+5:302014-11-29T23:44:14+5:30
वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची छाया होते आहे गडद : जलसाठय़ाची स्थितीही विदारक.

भूगर्भातील जलस्तर घटला!
संतोष मुंढे / वाशिम
जिल्हा दूष्काळाच्या खाईत ढकलला गेल्याचे हंगामी व सुधारीत पिक पैसेवारीने स्पष्ट केले. त्यातच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस वाशिम जिल्ह्याच्या भूगर्भातील जलस्तर - १.२६ मिटरने घटल्याने जिल्ह्यात दूष्काळाची दाहकता तिव्र होण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख हेक्टरवरील खरिप पिकाच्या हंगामात मुख्य व नगदी पिकाच्या उत्पादनात पूरती वाट लागली आहे. अत्यल्प झालेल्या पावसामुळे शेतकर्यांना नापिकीला सामोरे जावे लागण्याची पाळी आली.
या नापीकीची तिव्रता हंगामी व सुधारीत अशा दोन्ही टप्प्यात पिक पैसेवारी ५0 पैशाच्या आत आल्याने जिल्हा दूष्काळाच्या खाईत असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. जिल्ह्यातील जवळपास १0३ जलसाठेही त्यांच्यातील जलसाठा पाहता भविष्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची बाब अधोरेखीत करीत आहेत. गत पाच वर्षाच्या जलस्तराचा आढावा घेता वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा मानोरा या सहाही तालुक्याच्या आढाव्यात 0.२८ मिटरने जलस्तरात वाढ झाल्याची नोंद असली तरी. गतवर्षीच्या तूलनेत मात्र यावर्षी नोव्हेंबरच्या अखेर जिल्ह्याच्या भूगर्भातील जलस्तर जवळपास १.२६ मिटरने घटल्याची नोंद झाली आहे. या घटत्या भूजलस्तरात सर्वाधिक १.६२ मिटरने रिसोड तालुक्यातील जलस्तर घटल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ वाशिम तालुक्यातील जलस्तर १.४६ मिटरने जलस्तर घटल्याची नोंद असून त्यानंतर मालेगाव १.१४, मानोरा १.0९ , मंगरुळपीर १.0५ तर कारंजा १.0२ भूजलपातळीत घट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
*जिल्ह्यातील १६ लघू प्रकल्पांनी गाठला तळ
जिल्ह्यातील १00 लघू प्रकल्पांपैकी १६ लघू प्रकल्पांनी तळ गाठल्याची माहिती आहे. या प्रकल्पांमध्ये १५ टक्कयांपेक्षा कमी जलसाठा असून यापैकी दोन लघू प्रकल्प कोरडेठण्ण पडल्याची स्थिती आहे. कोरडेठण्ण पडलेल्या लघू प्रकल्पात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील लघू प्रकल्प तर मानोरा तालुक्यातील पिंप्री हनुमान येथील लघू प्रकल्पाचा समावेश आहे. मानोरा व कारंजा तालुक्यात जलसाठय़ांची स्थिती आत्ताच दयनीय आहे.
* मध्यम व लघू प्रकल्पातही ४७.५0 टक्के जलसाठा
भूगर्भातील जलस्तर घटता आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम व १00 लघू प्रकल्पात मिळून केवळ ४७.५0 टक्केच जलसाठा असल्याने दूष्काळाच्या झळा किती तिव्र असतील याचा मागमोस येवू शकतो. वाशिम तालुक्यातील एकबूर्जी व मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पात अनुक्रमे ७१.६८ व ७0.३३ इतका जलसाठा दिसत असला तरी कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात केवळ २८.९५ टक्केच जलसाठा आजमितीला आहे. तालुकानिहाय विचार करता वाशिम तालुक्यातील २0 लघू प्रकल्पात ६0.२५ टक्के, मालेगाव तालुक्यातील २0 लघु प्रकल्पात ५२.९३ टक्के, रिसोड तालुक्यातील १३ लघू प्रकल्पात ५२.८४ टक्के, मंगरुळपीर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पात ६१.0७ टक्के, मानोरा तालुक्यातील २३ लघू प्रकल्पात ४0.५८ टक्के तर कारंजा तालुक्यातील एकूण ११ लघू प्रकल्पात आजघडीला केवळ ३१.0३ टक्केच जलसाठा असल्याची नोंद लघू पाटबंधारेच्या दप्तरी आहे.