ग्रामपंचायतींची ३८ टक्के कर वसुली !
By Admin | Updated: March 17, 2016 02:26 IST2016-03-17T02:26:03+5:302016-03-17T02:26:03+5:30
अल्प कर वसुलीमुळे ग्रामविकासात खीळ; कर वसुलीची विशेष मोहीम गतिमान करण्याची गरज.

ग्रामपंचायतींची ३८ टक्के कर वसुली !
संतोष वानखडे / वाशिम
विविध प्रकारच्या कर वसुलीतून ग्राम पंचायत स्तरावर विकासात्मक कामे केली जातात; मात्र ग्राम पंचायतींच्या कर वसुलीचे सरासरी प्रमाण केवळ ३८ टक्के असल्याने विकासात्मक कामांना खीळ बसत आहे.
ग्राम पंचायतच्या मालमत्ता व पाणी कराची १00 टक्के वसुली ३१ मार्च २0१६ पूर्वी करण्याची बाब शासनाने गांभीर्याने घेतली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषद प्रशासनाने कर वसुलीच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या आहेत. कर वसुलीसाठी २८ ते ३१ मार्चदरम्यान विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे. सन २0१५-१६ या वर्षात वाशिम जिल्ह्यातून सर्व ग्रामपंचायतींनी २ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपयांचा थकित घर व पाणी कर वसूल करणे अपेक्षित आहे. जानेवारी २0१६ अखेर १ कोटी २ लाख ७४ हजार रुपयांचा कर वसूल केला असून, याची टक्केवारी ३७.५५ अशी आहे. फेब्रुवारी महिन्याचा अहवाल येणे बाकी आहे. वाशिम पंचायत समितींतर्गत येणार्या ग्रामपंचायतींनी १९.९९ लाख रुपयांचा थकीत घर व पाणी कर वसूल करणे अपेक्षित आहे. जानेवारी २0१६ अखेर १0.१७ लाखांचा कर वसूल केला असून, याची टक्केवारी ५0.८८ अशी आहे. रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ११९.३७ लाख रुपयांचा थकीत घर व पाणी कर वसूल करणे अपेक्षित आहे. जानेवारी २0१६ अखेर ४५.३६ लाखांचा कर वसूल केला असून, याची टक्केवारी ३८ अशी आहे. मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ४९.४८ लाख रुपयांचा थकीत घर व पाणी कर वसूल करणे अपेक्षित आहे. जानेवारी २0१६ अखेर १७.३१ लाखांचा कर वसूल केला असून, याची टक्केवारी ३५ अशी आहे. ३१ मार्च २0१६ पर्यंत कर वसुलीचा ६0 टक्क्याचा आकडा गाठला जातो की नाही? यावर संबंधित यंत्रणेचे यशापयश अवलंबून राहील.