चोरट्यांकडून हजारोंचा माल हस्तगत
By Admin | Updated: November 9, 2014 01:09 IST2014-11-09T01:09:05+5:302014-11-09T01:09:05+5:30
कारंजा पोलिसांची कामगिरी.

चोरट्यांकडून हजारोंचा माल हस्तगत
कारंजा लाड (वाशिम) : वाहनांच्या बॅटर्या व तांब्याची तार चोरणार्या ४ जणांना कारंजा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ८ नोव्हेंबर रोजी ३४ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मंगलवारा परिसरातील अ. सलीम अ. मजीद (३0), बरकतशहा सैफुल्लाशहा (२३), रिजवान ऊर्फ राजा सुल्तान खान (२0) व अ. जमील अ. मज्जीद (२५) यांना ४ नोव्हेंबर रोजी वाहनांच्या बॅटर्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना न्यायालयासमक्ष उभे केले असता त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या कोठडीदरम्यान पोलिसांना आरोपींकडून माल हस्तगत करता आला नाही. त्यानंतर सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली; परंतु कारंजा पोलिसांच्या विनंतीवरून न्यायालयाच्या आदेशाने सर्व आरोपींना पुन्हा ७ ते ९ नोव्हेंबरपर्र्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपासाअंती पोलिसांनी आरोपीकडून २0 हजार रुपये किमतीच्या २४ नग सेल बॅटर्या, ८ हजार रुपये किमतीची २0 किलो तांब्याची तार व ५ हजार ५00 रुपयांची पीकअप वाहनाची बॅटरी असा ३३ हजार ५00 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास देशमुख व ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा पोलिस करीत आहे.