जि.प. सीईओंच्या आकस्मिक भेटी अन् अधिकारी-कर्मचारी झाले सतर्क
By नंदकिशोर नारे | Updated: March 18, 2024 16:13 IST2024-03-18T16:12:55+5:302024-03-18T16:13:12+5:30
लोकाभिमुख, गतिमान कामकाजाला पारदर्शकतेची जोड देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैभव वाघमारे यांनी गावस्तरावर भेटी देण्याची मोहीम हाती घेतली.

जि.प. सीईओंच्या आकस्मिक भेटी अन् अधिकारी-कर्मचारी झाले सतर्क
वाशिम : लोकाभिमुख, गतिमान कामकाजाला पारदर्शकतेची जोड देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैभव वाघमारे यांनी गावस्तरावर भेटी देण्याची मोहीम हाती घेतली. नागरतास (ता. मालेगाव) येथील अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आहाराबाबतचा साठा कमी आढळून आल्याने याप्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकेच्या वेतनातून रक्कम वसूल करण्याचे निर्देश सीईओंनी बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांना दिले.
साधारणत: एका महिन्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व अंगणवाडी केंद्राच्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनिसांची मॅरेथॉन बैठक घेऊन शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी दिल्या होत्या. जे शिक्षक व मुख्याध्यापक चांगले काम करतील त्यांच्यासाठी माझ्याएवढा चांगला मित्र कोणी नसणार आणि जे कर्तव्यात कसूर करतील, त्यांच्यासाठी माझ्याएवढा शत्रू कोणी नसेल, अशा शब्दात त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते.
एका महिन्यानंतर आता अंगणवाडी केंद्र व शाळांच्या प्रत्यक्ष भेटीला सुरूवात केल्याने कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाल्याचे पाहावयास मिळते. नागरतास येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली असता, आहाराबाबतची माहिती घेतली. प्रत्यक्षातील साठा कमी असल्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या पगारातून रक्कम वसुल करण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्याचबरोबर संपूर्ण रेकॉर्ड तपासणी करून सीडीपीओ सारिका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.