शासकीय गोदामाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळ खात
By Admin | Updated: July 12, 2014 02:12 IST2014-07-12T02:06:11+5:302014-07-12T02:12:07+5:30
रिसोड येथील शासकीय गोदामाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित.

शासकीय गोदामाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळ खात
विवेकानंद ठाकरे /रिसोड
येथे शासकीय धान्य साठविण्यासाठी गोदाम निर्माण करण्यात यावे यासाठी तहसील प्रशासनाने अन्न पुरवठा मंत्रालयाकडे पाठविलेला प्रस्ताव गत दोन वर्षांपासून धूळ खात आहे. परिणामी, धान्य साठवण्यासाठी तहसील प्रशासनावर गोदाम भाड्याने घेण्याची पाळी आली असून, यामध्ये शासनाच्या पैशांचा चुराडा होत आहे.
येथे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना वाटपासाठी मिळणारे धान्य साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील तहसील प्रशासनाने सन २0११-१२ मध्ये गोदाम निर्माण करण्यात यावे यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यासाठी हिंगोली मार्गावरील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूची जागाही प्रस्तावित करण्यात आली होती. तब्बल एक कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही प्रस्तावासोबत पाठविले होते; परंतु हा प्रस्तावच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे रखडला आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात शासकीय धान्य साठविण्यासाठी एकही गोदाम नाही. परिणामी, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत तालुक्याच्या वाट्याला येणारे धान्य साठविण्यासाठी तहसील प्रशासनाला भाड्याच्या गोदामाचा आधार घ्यावा लागतो. भाड्याच्या गोदामामध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. गोदामाचा प्रश्न निकाली निघावा यासाठी तहसीलकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.