शासकीय वाहनं अधिका-यांच्या दिमतीला
By Admin | Updated: September 25, 2014 01:46 IST2014-09-25T01:34:10+5:302014-09-25T01:46:46+5:30
वाशिम जिल्ह्यातील प्रकार, अधिका-यांना ने-आण करण्याकरिता शासकीय गाड्यांचा वापर.

शासकीय वाहनं अधिका-यांच्या दिमतीला
वाशिम : शहरातील अनेक शासकीय कार्यालयांचे खातेप्रमुख, कर्मचारी मुख्यालयी न राहता इतरत्र राहून अप-डाऊन करतात. एवढेच नव्हे तर या शासकीय अधिकारी व कर्मचारी रेल्वे स्टेशन तथा बस स्थानकावर शासकीय वाहनांचा गैरवापर करीत असल्याचे वास्तव लोकमतने २४ सप्टेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले.
वाशिम शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी या कार्यालयाबरोबरच लघु पाटबंधारे उपविभाग (जि. प.), ल. पा. स्थानिक स्तर (जलसंपदा), जिल्हा सामान्य रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प. बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, भूमीअभिलेख, सामाजिक वनीकरण, दुकाने निरीक्षक आदी विविध शासकीय विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय कार्यालय कार्यरत आहेत.
या शासकीय कार्यालयातील विविध बहुतांश खातेप्रमुख आपल्या मुख्यालयी राहत नसून अपवादात्मक अधिकारी वगळता अन्य कार्यालयांचा कारभार उंटावरून शेळ्या राखणे, या म्हणीप्रमाणे चालविला जात आहे. विशेषत: काही विभागाच्या खातेप्रमुखांना शासकीय निवासस्थान उपलब्ध असतानाही त्यामध्ये राहत नसल्याचे निदर्शनास येत आहे. २४ सप्टेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील कुष्टरोग अधिकारी यांनी शासकीय वाहनांचा दुरूपयोग केल्याचे आढळून आले.