वाहन बाजाराला ‘अच्छे दिन’ !
By Admin | Updated: April 20, 2017 02:11 IST2017-04-20T02:11:23+5:302017-04-20T02:11:23+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहन विक्रीत वाढ : १८ हजार २३० वाहनांची विक्री

वाहन बाजाराला ‘अच्छे दिन’ !
वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहन बाजाराला ‘अच्छे दिन’ आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सन २०१५-१६ या वर्षात १५ हजाराच्या आसपास वाहनांची विक्री झाली होती. सन २०१६-१७ या वर्षात १८ हजार २३० वाहनांची विक्री झाली.
सन २०१४ ते २०१५ या वर्षात निसर्गाची साथ न मिळाल्याचा फटका वाहन बाजारालादेखील बसला होता. २०१६ मध्ये पावसाने बऱ्यापैकी साथ दिल्याने वाहन बाजाराला २०१६ वर्षे अनुकूल राहिल्याचे दिसून येते. एरव्ही १३ ते १४ हजारादरम्यान वाहन विक्री असताना, २०१६-१७ या वर्षात १८ हजारावर वाहन विक्री झाली. या सत्रात जिल्ह्यात एकूण १८ हजार २३० नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यात १५ हजार ३८१ दुचाकी, ९७४ चारचाकी (कार व जीप), १ आॅटोरिक्षा, ५१ ट्रक, ३५६ डिलीव्हरी व्हॅन, १४४५ ट्रॅक्टर-ट्रेलर, २२ प्रवासी वाहनांचा समावेश आहे. गतवर्षी १५ हजाराच्या आसपास वाहन विक्री झाली होती. यामध्ये ११ हजार ३४० मोटारसायकली, ८९३ कार, ११५८ ट्रॅक्टर, ट्रेलर यासह अन्य वाहनांच्या विक्रीचा समावेश आहे.
तसेच सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून २० हजार ५६८ चालकांनी वाहन चालक परवाना काढला आहे.
वाहतुकीच्या नियमांचा एक भाग म्हणून वाहन चालविण्यासाठी चालकाला वाहन चालक परवाना बंधनकारक आहे. वाहन चालक परवाना काढण्यासाठी चालकाला आॅनलाईन परीक्षा व वाहन चालक चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर परवाना दिला जातो. २०१६-१७ या वर्षात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे २०५६८ जणांनी या दोन्ही चाचण्या उत्तीर्ण केल्याने त्यांना वाहन चालक परवाना देण्यात आला. ३३३७ जणांना नवीन वाहक परवाना (कंडक्टर लायसन्स) देण्यात आले.