शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:34+5:302021-09-06T04:45:34+5:30
वाशिम : टोमॅटोचे दर कमी झाल्याने वाशिमसह राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे ...

शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्या
वाशिम : टोमॅटोचे दर कमी झाल्याने वाशिमसह राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एकरी किमान ५० हजार रुपयांचे अनुदान द्या अन्यथा शासकीय कार्यालयात टोमॅटो फेको आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर यांच्या नेतृत्वात ३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
सध्या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या टोमॅटोच्या २५ ते ३० किलोच्या कॅरेटला ८० ते १०० रुपयांचा भाव मिळत आहे. २ ते ३ रुपये किलो असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. टोमॅटोचा एकरी उत्पादन खर्च हा १ लाख रुपयांच्या जवळपास असल्याने उत्पादन खर्च तर लांबच सध्याच्या भावात वाहतूक व तोडणीचा खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच बहुतांश शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत अथवा गुराढोरांना खायला टाकत आहेत. अशा वेळी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकारने उभे टाकले पाहिजे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत शासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हा सचिव अमोल गाभणे, गजानन धोंगडे, कृष्णा इंगळे, रवी वानखेडे, अमोल मुळे, फकिरा कर्डिले, दिलीप शेंडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
००००००००००००
प्रति किलो १० रुपये दर निश्चित करावे
पणन मंडळाच्या माध्यमातून सरकारने प्रति किलो १० रुपये दर निश्चित करून मागणी असलेल्या राज्याबाहेरील बाजार समित्यांमध्ये टोमॅटो पाठवावे. जेणेकरून दरामध्ये सुधारणा होईल. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर एवढे मोठे संकट आलेले असताना राज्य सरकार काहीच मदत शेतकऱ्यांना करत नाही, असा आरोपही यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय याठिकाणी टोमॅटो फेको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.