भूत, भानामती जादूटोणा थोतांडच!
By Admin | Updated: November 15, 2014 01:00 IST2014-11-15T01:00:37+5:302014-11-15T01:00:37+5:30
वाशिम येथे जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जागर, श्याम मानव यांचा घणाघाती आघात.

भूत, भानामती जादूटोणा थोतांडच!
वाशिम: जगात कुठेही भूत,भानामती व जादूटोणा नाही. हे सारे थोतांडच आहे, असे म्हणत प्रा. श्याम मानव यांनी अशा अंधश्रद्धांवर कडाडून हल्ला चढविला. वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत १३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या जाहीर व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांवर उपस्थितांचे प्रबोधन केले. जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत १३ नोव्हेंबर रोजी प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आजघडीला समाजामध्ये नेमक्या कोणत्या अंधश्रध्दा आहेत व त्यामुळे अनेकांचे कसे बळी गेले, समाजाची नेमकी कोणती हाणी होते आहे हे प्रा. मानवांनी सोदाहरणासह पटवून दिले. जादूटोनाविरोधी कायद्यामुळे नेमकी काय व कशी शिक्षा होऊ शकते, याची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. केवळ अशिक्षीतांमध्येच अंधश्रध्दा आहे असे नाही, तर सुशिक्षीतांमध्येही अंधश्रध्देचे प्रमाण मोठे असल्याचे सांगून त्या अंधश्रध्दा नेमक्या कोणत्या यावरही प्रा. मानवांनी प्रकाश टाकला.