वाशिम शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत
By Admin | Updated: July 30, 2014 00:35 IST2014-07-30T00:35:23+5:302014-07-30T00:35:23+5:30
छुप्या मार्गाने गुटखा विक्री जोमात: २ रूपयाच्या पुडीची ५ रूपयात विक्री

वाशिम शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत
वाशिम : महाराष्ट्रात गुटखा बंदी लागू झाल्यानंतरही सर्रास गुटखा पुडया विकल्या जात असून गत आठवडयाभरापासून अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवल्याने गुटखा विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र शहरातील गुटख्याचा काळाबाजार अद्यापही थांबलेला नाही. शहरातील बहुतांश पान सेंटरवर चढय़ा भावाने गुटख्याची विक्री सुरू आहे. अकोल्याच्या अन्न व औषध प्रशासनाने अकोला व वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षात एकूण ७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त करूनही गुटखा विक्री बंद न होता मोठया प्रमाणात सुरूच आहे. आजही कोणत्याही पानठेल्यावर गुटखा पुडया विक्रीस मिळत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांचा दौरा असल्यास सर्वप्रथम माहिती व्यावसायिकांना मिळते व शहरात चिल्लर होणारी गुटख्याची विक्री काही वेळपर्यंंत बंद राहते. राज्य शासनाने २0 जुलै २0१२ रोजी राज्यात गुटखा बंदी केली आहे. गुटखाबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनावर सोपविली आहे. वाशिम जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने अकोला येथूनच वाशिमच्या कारभाराचा गाडा हाकला जात आहे. याचा पुरेपुर फायदा गुटखा किंग घेताना दिसून येत आहेत. गत आठवडयापासून मात्र शहरात गुटखा पुडयांचा तुटवडा असल्याने विक्रेत्यांनी २ रूपयाची पुडी ५ रूपयामध्ये केली असली तरी शौकीन मात्र ते सेवन करीत असल्याचे दिसून येत आहे.