गृहभेटीतून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचविली शिक्षणाची गंगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:48 IST2021-09-05T04:48:16+5:302021-09-05T04:48:16+5:30
वाशिम : कोरोनाकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून गृहभेटीद्वारे शरद सुरसे नामक शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रत्यक्ष ...

गृहभेटीतून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचविली शिक्षणाची गंगा!
वाशिम : कोरोनाकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून गृहभेटीद्वारे शरद सुरसे नामक शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे दिले, तसेच ऑनलाइन पद्धतीनेही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यात यश मिळविले. मंगरुळपीर तालुक्यातील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, पोटी येथे कार्यरत शरद रघुनाथ सुरसे यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा प्रयत्नही चालविला आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु दुर्गम भागातील व मोबाइलची सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहचू शकत नाही. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शरद सुरसे यांनी सातत्याने गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, शिक्षणाचे धडे दिले. असे करताना कोरोनाविषयक नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजीही घेतली. मोबाइलची सुविधा असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाबाबत प्रेरित केले. विद्यार्थी/पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून, त्यामार्फत सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, संपर्कात राहणे, कॉन्फरन्स कॉल करून, विद्यार्थ्यांच्या गटाला मार्गदर्शन करणे आदी उपक्रम राबविले, तसेच आताही उपक्रम राबवित आहेत.
००००००००००००००
राज्यस्तरीय ऑनलाइन विकास मंचासाठी निवड
ऑनलाइन शिक्षण प्रणालीतही शरद सुरसे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून राज्यस्तरीय ऑनलाइन विकास मंचासाठी त्यांची निवड झालेली आहे. स्वाध्याय उपक्रमाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी केली.
०००००००००००००
राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित
सुरुवातीपासून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या शरद सुरसे यांना राज्य शिक्षक पुरस्कारानेही यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे. कोरोनाकाळातही त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत, आपले कार्य सुरूच ठेवले आहे.
००००००००००००००
‘एटीएम’ ग्रुपमार्फत ऑनलाइन उजळणी वर्ग
कोरोना काळात ‘वक्तृत्व, चित्रकला, निबंध आदी ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. एटीएम (ॲक्टिव्ह टीचर्स ऑफ महाराष्ट्र) या ग्रुपमार्फत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन उजळणी वर्ग घेतला. ऑनलाइन पद्धतीने शिकविलेले विषय विद्यार्थ्यांना नेमके किती प्रमाणात समजले, याची पडताळणी म्हणून उजळणी वर्ग घेण्याला प्राधान्य दिले. राज्यस्तरीय कवितागायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग व द्वितीय पारितोषक प्राप्त.