पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर चालला गजराज
By Admin | Updated: February 7, 2015 02:17 IST2015-02-07T02:17:07+5:302015-02-07T02:17:07+5:30
रिसोड येथे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने काढले अतिक्रमण.

पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर चालला गजराज
रिसोड (वाशिम): रिसोड नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेस ६ फेब्रुवारीपासून पोलीस बंदोबस्तात प्रारंभ करण्यात आला. अनेक भागातील अतिक्रमणावर गजराज चालून इमारती उध्वस्त करण्यात आल्यात.
दोन दिवसीय अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी शहरातील आंबेडकर चौक, ,गुरुवार बाजार, सिव्हील लाईन या भागामध्ये अतिक्रमणावर गजराज फिरविण्यात आला. अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान कोणताही वाद होवू नये याकरीता शहरात सकाळी ११ वाजता पासून अतिक्रमण हटाव मोहीम पोलिस ताफ्यासह काढण्यास सुरुवात केली . अनेक अतिक्रमण धारकांनी स्वत:हा अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. काही क्षणातच गजबजलेला रस्ता मोकळा मोकळा झाला. गुरुवार बाजार मधील दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटल्याने रस्ता मोकळा झाल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. रस्त्याच्या बाजुला अतिक्रमणाने वेढा घातल्याने रहदारीचा मुख्य प्रश्न निर्माण झाला होता. यामार्गावर शाळा असल्यामुळे सतत वर्दळीचा रस्ता आहे. सदर रस्ता अतिक्रमण मुक्त व्हावा अशी मागणी नेहमीच जोर धरत होती. अखेर एकदा हा मार्ग मोकळा झाला. तसेच न.प.शाळेसमोरील रस्ता कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत होता. अखेर तोही प्रश्न आता निकालात निघाला आहे. न.प.शाळेला आता हक्काचा रस्ता प्राप्त झाला आहे. दोन्ही मार्गाला जोडणारा हा रस्ता ठरला आहे. उदया ७ फेब्रुवारी रोजी अतिक्रमण हटाव मोहीम सिव्हील लाईन, वाशिम नाका, मालेगाव नाका या भागात राबविली जाणार आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये न.प.मुख्याधिकारी दीपक इंगोले, सहाय्यक पोलिस निरिक्षक विजयरत्न पारखी, नायब तहसीलदार सरनाईक, साबा विभागाचे अभियंता दांदळे, सह न.प.कर्मचारी , पोलिस मंडळी आदींनी सहकार्य केले आहे.
दरम्यान रिसोड येथे विकासाच्या दृष्टीने व नागरिकांना अडचणी निर्माण होवू नये याकरता अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे अवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी स्पष्ट केले.