वृध्द कलावंतांच्या व्यथांवर मायेची फुंकर
By Admin | Updated: August 29, 2014 01:55 IST2014-08-29T01:54:14+5:302014-08-29T01:55:25+5:30
मानधनात वाढ, सप्टेंबरपासून अंमलबजावणी

वृध्द कलावंतांच्या व्यथांवर मायेची फुंकर
वाशिम : मानधन वाढविण्याबाबतच्या व्यथा वृध्द कलावंत गत काही वर्षांपासून शासन दरबारी मांडत आले आहेत. वृध्द साहित्यिक व कलावंतांच्या व्यथांवर शासनाने मायेची फुंकर घातली आहे. अ, ब व क दर्जाचे वृध्द साहित्यिक व कलावंतांना सप्टेंबर २0१४ पासून ५0 टक्के वाढीचे मानधन मिळणार आहे. याचा लाभ राज्यभरातील २३ हजार ३७२ कलावंतांना मिळणार आहे.
साहित्य व गीत-गायन, भजन, पोवाड्याच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य करण्याचा विडा अनेक साहित्यिक व कलावंतांनी उचलला आहे. समाजविघातक प्रवृत्ती, समाजातील वाईट प्रथा, बालविवाह, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला अत्याचार आदी बाबींवर साहित्य व भजन, गीतगायन, पोवाड्याच्या माध्यमातून प्रहार करणार्या साहित्यिक व कलावंतांना वृद्धापकाळात आर्थिक मदतीचा हात मिळावा म्हणून शासनाने मानधन द्यावे, अशी मागणी राज्यभरातून समोर आली होती. यावर शासनाने वृद्ध कलावंत व साहित्यिकांचे अ, ब व क दर्जा असे प्रकार पाडून मानधन निश्चित केले होते. गत पाच वर्षांपासून अ दर्जाच्या वृद्ध कलावंतांना १४00 रुपये, ब दर्जाच्या कलावंतांना १२00 व क दर्जाच्या कलावंतांना १000 रुपये मानधन मिळत होते. महागाईच्या काळात या मानधनात वाढ करण्याची मागणी राज्यभरातील वृद्ध कलावंतांनी शासनाकडे लावून धरली होती. या मागणीची दखल राज्य शासनाने ऑगस्टच्या पंधरवड्यात घेतली असून, त्यानुसार सप्टेंबर २0१४ पासून राज्यभरातील २३ हजार ३७२ कलावंतांना ५0 टक्के वाढीव मानधन मिळणार आहे. या निर्णयामुळे अ दर्जाच्या वृद्ध कलावंतांना २१00 रुपये, ब दर्जाच्या कलावंतांना १८00 रुपये आणि क दर्जाच्या वृद्ध कलावंतांना १५00 रुपये मानधन मिळणार आहे.