‘रमाई आवास’चा निधी अडकला; २०८ घरकुलांची कामे अपूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:34+5:302021-01-13T05:45:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : तालुक्यातील गत दोन वर्षांत प्रधानमंत्री आवास आणि रमाई घरकुल योजनेतून ६०२ घरकुल मंजूर ...

‘रमाई आवास’चा निधी अडकला; २०८ घरकुलांची कामे अपूर्ण!
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : तालुक्यातील गत दोन वर्षांत प्रधानमंत्री आवास आणि रमाई घरकुल योजनेतून ६०२ घरकुल मंजूर झाले; मात्र त्यातील केवळ ३९४ घरांचीच कामे पूर्ण झाली असून, ‘रमाई’साठी निधीच नसल्याने २०८ घरकुलांची कामे अपूर्ण राहिली आहेत. तसेच नव्याने ३३५ घरकुलांची कामे प्रस्तावित आहेत.
घरकुल उभारण्याकरिता लाभार्थींना एकूण एक लाख ३८ हजार रुपयांचा निधी दिला जातो. कारंजा पंचायत समितीला गत दोन वर्षांत ६०२ घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात २०१८-१९ मध्ये ७५ घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ६६ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहे, तर ९ कामे प्रलंबित आहेत. २०१९-२०मध्ये ३७७ घरकुल मंजूर झाली. त्यापैकी २३६ कामे पूर्ण झाली, तर १४१ अपूर्ण आहेत. तसेच २०२०-२१ मध्ये मंजूर झालेल्या २५१ घरकुलांचीही कामे सध्या सुरू आहेत.
रमाई घरकुल योजनेसाठी २०१८-१९मध्ये १५० घरकुल मंजूर झाली. त्यातील ९२ कामे सुरू असून, ५८ कामे अर्धवट अवस्थेत आहेत. २०१९-२० मध्ये याच योजनेतून ३३५ घरकुल मंजूर झाले; परंतु शासनाकडून अद्यापपर्यंत निधी न मिळाल्याने ही कामे सुरू होऊ शकली नाही.
.......................
कोट :
कारंजा तालुक्यात दोन वर्षांत ३९४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. घरकुल उभारण्याकरिता रेतीची अडचण जाणवत असून, काही लाभार्थींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने २०८ घरकुलांची कामे प्रलंबित आहेत. ही कामेदेखील विनाविलंब पूर्ण करण्याच्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- कालिदास तापी
गटविकास अधिकारी, पं.स., कारंजा