निधी मंजूर पण प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत निर्माणाची प्रतीक्षा कायमच
By Admin | Updated: October 27, 2014 01:01 IST2014-10-27T01:01:43+5:302014-10-27T01:01:43+5:30
शिरपूर जैन येथील चित्र, वैद्यकीय सुविधांचा बोजवारा.

निधी मंजूर पण प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत निर्माणाची प्रतीक्षा कायमच
शिरपूर जैन (वाशिम): ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शिकस्त झाली आहे. सहा बेडच्या या इमारती आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या ३३ गावातील ५१ हजारांच्यावर झालेल्या लोकसंख्येला सुविधाच मिळत नसल्याने वैद्याकीय सुविधांनी सुसज्ज अशी इमारत मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न नागररिकांना पडला आहे.
शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी जवळपास पावणेदोन कोटीचा निधी मंजूर आहे; परंतु जोवर शिकस्त झालेल्या जुन्या इमारतीची अपेक्षित रकमेत हरासी होत नाही तोपर्यंत नवीन इमारतीचा विषय मार्गी लागू शकत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे निधी मंजूर असला व सुविधांचा कितीही अभाव असला तरी शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल तरी केव्हा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या आरोग्य केंद्रामध्ये मोठय़ा प्रमाणात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया होतात. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना सात दिवस आरोग्य केंद्रामध्ये राहावे लागते; परंतु शौचालयाची व्यवस्था नसल्याने रुग्णांना व त्यांच्या सोबतच्यांना उघड्यावर शौचास जावे लागते. भारनियमन काळात जनरेटरअभावी रुग्णालयातील लाईट व पंखे बंद राहतात. असुविधांचा फटका रुग्णांसह अधिकारी-कर्मचार्यांना बसत आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत शिरपूर १, २, ३ तसेच करंजी, खंडाळा, वसारी, चिवरा, शिरसाळा, ही आठ उपकेंद्रे येतात.
* बेबी केअर युनिट धूळ खात..
शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसाआड किमान एक प्रसूती होते. त्यामुळे होणार्या बाळाच्या सुविधेसाठी बेबी केअर युनिट तिथे दिले गेले; परंतु कार्यान्विततेअभावी ते युनिट धूळ खात पडले आहे. याबरोबरच प्रसूती झालेल्या वा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना गरम पाणी मिळण्याची सोय जरी आरोग्य विभागाने केली असली तरी गरम पाण्यासाठीचे यंत्रच कार्यान्वित केले नसल्याने रुग्णांना गरम पाणीच मिळत नाही.