जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले फटाके!
By Admin | Updated: March 18, 2016 02:04 IST2016-03-18T02:04:37+5:302016-03-18T02:04:37+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटना : दुष्काळाच्या मुद्यावर भेट नाकारली!

जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले फटाके!
वाशिम: जिल्हय़ात सर्वदूर भीषण दुष्काळसदृश स्थिती उद्भवली असताना जिल्हय़ाचा अद्याप दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झालेला नाही. दरम्यान, या मुद्यावर गुरुवार, १७ मार्च रोजी चर्चा करण्यास गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांना जिल्हाधिकार्यांनी भेट नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकार्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविला.
यासंदर्भातील निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नमूद केले आहे, की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनदरबारी पैसेवारीचा अहवाल पाठवायला उशीर करण्यात आला. यात शेतकर्यांचा कुठलाही दोष नसताना ते वेठीस धरल्या गेले. राज्यातील अनेक जिल्हय़ांमध्ये दुष्काळ जाहीर होऊन त्या जिल्हय़ांतील शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभदेखील मिळणे सुरू झाले आहे; मात्र वाशिम जिल्हय़ात भयावह स्थिती उद्भवली असताना तद्वतच विविध प्रकारच्या संकटांचा सामना करून हतबल झालेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबित असताना वाशिम जिल्हय़ातील एकाही गावात दुष्काळ जाहीर झालेला नाही.
शासनदरबारी अहवाल पाठविण्यास उशीर झाल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. एकूणच या सर्व विदारक स्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. याप्रसंगी संघटनेने जिल्हाधिकार्यांना वेळ मागितली असता, जिल्हाधिकार्यांनी ती दिली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणि जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून निषेध व्यक्त केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.