समता फाऊंडेशनतर्फे रिसोडात मोफत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:35+5:302021-09-10T04:49:35+5:30
५ जून ते २७ जून यादरम्यान समता फाऊंडेशनच्यावतीने रिसोड तालुक्यात तीस हजार नागरिकांचे नि:शुल्क लसीकरण करण्यात आले होते. एवढ्या ...

समता फाऊंडेशनतर्फे रिसोडात मोफत लसीकरण
५ जून ते २७ जून यादरम्यान समता फाऊंडेशनच्यावतीने रिसोड तालुक्यात तीस हजार नागरिकांचे नि:शुल्क लसीकरण करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण तालुक्याचे लसीकरण करणारी समता फाऊंडेशन ही एकमेव संस्था ठरली होती. अवघ्या २२ दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्या लसीचे लसीकरण झाल्याने दुसऱ्या डोसच्या लसीकरणाकरिता सरकारी यंत्रणेवर अधिक भार पडू नये म्हणून समता फाऊंडेशनने रिसोड शहरातील नागरिकांसाठी दुसऱ्या डोसची व्यवस्था केली आहे. शहरातील प्रत्येक वाॅर्डात दुसऱ्या डोसचे कुपन वाटण्याचे कार्य समता फाऊंडेशनचे स्वयंसेवक करीत असून पहिल्या डोसच्या वेळी शहरातील ज्या पाच लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी लस घेतली होती त्याच केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस नागरिकांना मिळणार आहे. ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर यादरम्यान भारत माध्यमिक शाळा व जुनिअर कॉलेज, उत्तमचंदजी बगडिया महाविद्यालय, अल्लाहम्मा इक्बाल स्कूल, विश्वा लॉन कॉम्प्लेक्स आणि एमएआयटी निजामपूर येथील लसीकरण केंद्रांवर नागरिकांचे लसीकरण होणार आहे. समता फाऊंडेशनद्वारे कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्या रिसोड शहरातील नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या कुपनवरील दिनांक व वेळेनुसार कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन समता फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.