दबंग महिला अधिकाऱ्याच्या कारवाईने चाेरट्यांनी घेतली धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:29+5:302021-09-10T04:49:29+5:30
वाशिम : दिवसेंदिवस वाढत चाललेली वीजचाेरी व यामुळे वीज वितरण कंपनीवर पडत असलेला भार व ताण लक्षात घेता ...

दबंग महिला अधिकाऱ्याच्या कारवाईने चाेरट्यांनी घेतली धास्ती
वाशिम : दिवसेंदिवस वाढत चाललेली वीजचाेरी व यामुळे वीज वितरण कंपनीवर पडत असलेला भार व ताण लक्षात घेता दबंग महिला प्रभारी सहायक अभियंता आर.एस. वार्डेकर यांनी आसेगाव उपकेंद्रातर्गत येणाऱ्या गावांत तब्बल १५ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख २७ हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईमुळे ग्रामीण भागात वीज चाेरट्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
३३ केव्ही विद्युत उपकेंद्र आसेगावअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीज मीटरबाहेरून वीजपुरवठा घेऊन हीटर, शेगडी चालवणे, आकडे टाकून मीटर जाम करून वीजचोरी करणे हे प्रकार चालत असल्याने वीज वितरण प्रणालीवर अतिरिक्त भार पडत होता; परंतु याला पायबंद घालण्याचे धारिष्ट्य कोणी करीत नव्हते. मात्र, आसेगाव उपकेंद्राचा केवळ प्रभार सांभाळीत असलेल्या महिला अधिकारी आर.एस. वार्डेकर यांनी निर्भीडपणे माहे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये चालविलेल्या धडक मोहिमेमध्ये धडक कारवाई केली. या कारवाईमुळे आसेगाव उपकेंद्रातर्गत येत असलेल्या अनेक गावांतील बहुतांश वीजचाेरीच्या प्रकाराला आळा बसल्याचे ग्रामस्थांमध्ये बाेलले जात आहे.
.....................
...अशा केल्या कारवाया
३३ केव्ही विद्युत उपकेंद्र, आसेगावअंतर्गत येणाऱ्या आसेगाव येथे ७ ठिकाणी कारवाई करण्यात आली, तसेच कुंभी येथे २, मंगरूळपीर ६, अशा एकूण १५ वीज चाेरट्यांवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून ३ लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला असून, यातून १९ हजार युनिट वीज बचत करण्यात आली आहे.
.....
वीजचोरीमुळे महावितरण कंपनीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीकडून वारंवार वीजचाेरी हा गुन्हा असल्याबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. त्यानंतरही अनेक गावांत वीजचाेरी हाेत असल्याची माहिती प्राप्त झाली हाेती. वीजचाेरीला आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात आली.
-आर.एस. वार्डेकर,
सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी उपविभाग, मंगरूळपीर