शासकीय दंत महाविद्यालयासाठी चार जागांची पाहणी
By Admin | Updated: March 4, 2016 02:14 IST2016-03-04T02:14:33+5:302016-03-04T02:14:33+5:30
अहवाल वरिष्ठांच्या दरबारात.

शासकीय दंत महाविद्यालयासाठी चार जागांची पाहणी
वाशिम : वाशिम येथे नवीन शासकीय दंत महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर व औरंगाबाद येथील चमूने गुरूवारी वाशिम शहरानजीकच्या चार ठिकाणची पाहणी केली.
२0१५ च्या डिसेंबर महिन्यात विधिमंडळ सभागृहात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वाशिम येथे दंत महाविद्यालय जाहीर केले आहे. त्यानुसार दंत महाविद्यालय लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टिकोणातून महिन्याभरापूर्वी ना. मुनगुंटीवार यांनी अमरावती येथील आढावा बैठकीत दंत महाविद्यालयाबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. वाशिम येथे नवीन शासकीय दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालय सुरु करण्याबाबत शासनास अहवाल सादर करण्याकरिता समिती गठीत करण्याचे आश्वासन विधिमंडळ सभागृहात देण्यात आले होते. त्यानुसार आवश्यक समिती गठीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार १६ फेब्रुवारी २0१६ रोजी वाशिम येथे नवीन शासकीय दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालय सुरू करण्याकरिता भारतीय दंत परिषदेच्या निकषानुसार आवश्यक जागेची पडताळणी करणे व तद्नुषंगिक बाबींची पडताळणी करून शासनास अहवाल सादर करण्याकरिता समिती गठीत केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी, तर सदस्य म्हणून आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व एका एनजीओची प्रतिनिधी म्हणून निवड केली होती. या समितीच्या पथकाने दंत महाविद्यालयाकरिता तांत्रिकदृष्ट्या जागा व इतर बाबींची पाहणी करण्याकरिता ३ मार्च रोजी वाशिम गाठले. आमदार राजेंद्र पाटणी व चमूमधील औरंगाबाद येथील बनसोडे, इंदुरकर व नागपूर येथील गणवीर व डॉ. सातारकर या चार अधिकार्यांसह वाशिम तहसीलचे मंडळ अधिकारी श्याम जोशी, तलाठी नप्ते, कांबळे, इढोळे यांनी वाशिम शहरानजीकच्या चार जागेची पाहणी केली. या जागेसंबंधीची आवश्यक ती सर्व कागदपत्रे या चमूने सोबत नेली आहेत. योग्य तो अहवाल बनवून शासनाला सादर केला जाणार आहे. वाशिम येथे दंत महाविद्यालयाची कार्यवाही लवकर सुरू होण्याच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.