वाशिम : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गावरील डोंगरकिन्ही गावानजीक म्हशींची वाहतूक करणारा आयशर आणि ट्रक यांच्यात रविवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात आयशरमधील १४पैकी चार म्हशी जागीच ठार झाल्या; तर १० गंभीर जखमी झाल्या. वाहनचालकासही गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तब्बल दोन तास मार्गावरील वाहतूक जागीच ठप्प झाली होती.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, यवतमाळहून औरंगाबादकडे म्हशी घेऊन जाणारा आयशर (क्रमांक एमएच २० सीटी ८८८९) आणि औरंगाबादहून मालेगावकडे येत असलेल्या ट्रकची (क्रमांक ओडी २३ डी २९४७) समारोसमोर जबर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशर वाहनात असलेल्या १४पैकी चार म्हशी जागीच ठार झाल्या; तर १० म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातात आयशरचा चालक शे. अलीम शे. हसन (३८, रा. औरंगाबाद) हादेखील गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे तब्बल दोन तास नागपूर - औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक जागीच ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले व अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
......................
बाॅक्स :
एकाच वाहनात तब्बल १४ म्हशी कशा?
आयशर वाहनात तब्बल १४ म्हशी कोंबून वाहतूक केली जात होती. हा प्रकार नियमबाह्य असतानाही त्यास अनुमती कशी मिळाली? भीषण अपघातात १४पैकी चार म्हशींचा मृत्यू; तर १० म्हशी गंभीर जखमी झाल्या. त्यास जबाबदार कोण, आदी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.