माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुखही पक्षावर नाराज

By Admin | Updated: October 11, 2014 01:16 IST2014-10-10T23:08:47+5:302014-10-11T01:16:49+5:30

वाशिम जिल्ह्यात काँग्रेसला दुसरा धक्का

Former State Minister Anantrao Deshmukh, angry at the party | माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुखही पक्षावर नाराज

माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुखही पक्षावर नाराज

नंदकिशोर नारे /वाशिम
काँग्रेसमधील एका गटाच्या सापत्न वागणुकीमुळे पश्‍चिम विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुख पक्षावर नाराज आहेत. जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघावर पकड असलेले अकोल्याचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनीही पक्षावरील नाराजीतून कालच भाजप उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला. त्यापृष्ठभूमिवर आज अनंतराव देशमुखांनीही पक्षावर नाराजी व्यक्त केल्याने, काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण तापले असतांना, सर्वच पक्षात अफवांना ऊत आला आहे. त्याचप्रमाणे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची अफवाही वाशिममध्ये चर्चेत होती. यासंदर्भात अनंतराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, आपण पक्षाशी एकनिष्ठ असून कधीही, कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोब तच त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीवर तीव्र नाराजीही व्यक्त केली. रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होवून चार महिन्यांचा कालावधी उलटला. आपल्याला पक्षाकडून साधी विचारणाही करण्यात आली नाही. आता विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन एवढे दिवस उलटले तरी, पक्षाने आपल्याला कोणत्याही प्रक्रीयेत विश्‍वासात घेतले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
रिसोड विधानसभा मतदारसंघात अनंतराव देशमुख प्रतिस्पर्धी उमेदवारास सहकार्य करीत असल्याची चर्चाही राजकीय वतरुळात रंगली आहे. त्यासंदर्भात विचारणा केली असता, अनंतरावांनी या आरोपाचे खंडण केले. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, बाबासाहेब धाबेकर यांच्या पाठोपाठ अनंतराव देशमुख, या जिल्ह्यातील दुसर्‍या दिग्गज काँग्रेस नेत्याने पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी कुणाला अडचणीत आणते आणि कुणाच्या पथ्यावर पडते, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

Web Title: Former State Minister Anantrao Deshmukh, angry at the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.