खाद्यपदार्थ तपासणीला अन्न व औषध प्रशासनाचा ‘कोलदांडा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:55 IST2017-11-27T16:49:29+5:302017-11-27T16:55:44+5:30

खाद्यपदार्थ तपासणीला अन्न व औषध प्रशासनाचा ‘कोलदांडा’!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरातील विविध हॉटेल्स आणि हातगाड्यांवर खुले पदार्थ विकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना भेसळयुक्त व सेवनास अयोग्य अशा खाद्यपदार्थांवर रोख लावण्याकडे अन्न व औषध प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे भेसळयुक्त अन्नपदार्थांचे नमुने तपासण्याकरिता विभागात एकमेव अमरावती येथेच प्रयोगशाळा असल्याने ही बाब देखील जिकीरीचे ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम येथे अन्न व औषध प्रशासनाचे मुख्यालय अद्याप उभे झालेले नाही. त्यामुळे आजही अकोला येथूनच दोन्ही जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. मात्र, अधिकाऱ्यांनी वाशिमला कायमच दुय्यम दर्जाची वागणूक दिली असून जिल्ह्यात उघड्यावर विकल्या जाणाºया अथवा हॉटेल्स, बेकऱ्यामधून निकृष्ट दर्जाचे तेल, साहित्य वापरून तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची नियमित तपासणी केली जात नाही. अनेकांना दिल्या गेलेल्या खाद्यान्न परवान्यांचे नुतनीकरण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासनानेच लक्ष पुरवून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्याकरिता खाद्यपदार्थांच्या नियमित तपासणीस अन्न व औषध प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.