कारंजा तालुक्यावर चाराटंचाईचे सावट
By Admin | Updated: February 23, 2015 02:11 IST2015-02-23T02:11:12+5:302015-02-23T02:11:12+5:30
दर महिन्याला हजारो मेट्रिक टन चा-याची गरज.

कारंजा तालुक्यावर चाराटंचाईचे सावट
कारंजा (जि. वाशिम) : २0१४ मध्ये झालेल्या अत्यल्प पावसामुळे कारंजा तालुक्यावर सद्य:स्थितीत (दि.२२) चाराटंचाईचे संकट घोंगावत आहे. चाराटंचाईमुळे पशुपालकांच्या नाकीनऊ आले आहे. २0११ च्या जनगणनेनुसार जिल्हय़ात एकूण सहा लाख ८0 हजार ९५६ पशुधन आहे. प्रती जनावरांना ६ किलो या प्रमाणे सदर पशुधनाला दर महिन्याला हजारो मेट्रिक टन चारा आवश्यक आहे. अत्यल्प पावसामुळे यंदा तालुक्यात आवश्यक चार्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले असताना वाढलेल्या चार्याच्या किमतीने त्यांच्या समस्येत अधिकच भर घातली आहे. चार्याबरोबरच पाणीटंचाईनेदेखील पशुपालकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पाण्यासाठी पशूंना दूरवर न्यावे लागत आहे. कारंजा तालुक्यातील मध्यम व लघू प्रकल्पांमधील जलपातळीदेखील कमालीची घट होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सरासरी ३५ टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा लघू प्रकल्पांमध्ये आहे. चाराटंचाई निवारणार्थ तालुक्यात चारा डेपो सुरू करण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे.