वर्षभरात प्रथमच आढळला विषारी फुरसे साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:46 IST2021-09-06T04:46:00+5:302021-09-06T04:46:00+5:30
वाशिम : गेल्या वर्षभरात प्रथमच वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्र सदस्यांना फुरसे जातीचा विषारी साप आढळून आला आहे. मंगरुळपीर ...

वर्षभरात प्रथमच आढळला विषारी फुरसे साप
वाशिम : गेल्या वर्षभरात प्रथमच वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्र सदस्यांना फुरसे जातीचा विषारी साप आढळून आला आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे आढळलेल्या या सापाला सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून जंगलात सोडून जीवदान दिले.
वाशिम जिल्ह्यात साधारणत: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे चारच विषारी साप प्रामुख्याने आढळून येतात. त्यात नागाचा आढळ सर्वाधिक, तर फुरसे जातीच्या विषारी सापाचा आढळ सर्वात कमी आहे. सहा महिने, वर्षभरातून हा साप आढळतो.
वनोजा येथील गणेश कुरवाडे यांच्या गोठ्यातील गवताच्या पेंडीत रविवारी सकाळी १० च्या सुमारास दीड ते दोन फूट लांबीचा फुरसे जातीचा साप दिसला. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन टीमचे जिल्हा उपाध्यक्ष आदित्य इंगोले, शुभम हेकड, उमेश वारेकर यांनी हा साप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडला.
००००००००००००००००००००००
शेतकऱ्यांना दक्षतेचे आवाहन
गेल्या काही महिन्यांपासून सापांचा लोकवस्ती, गुरांचे गोठे व शिवारातील वावर वाढला आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी गुरांच्या गोठ्यात काम करावे लागते, शिवारात राबावे लागते. अशात अनवधानाने सर्पदंश होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन वन्यजीव अभ्यासक तथा जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी केले आहे.