रिसोड (जि.वाशिम) : वेडसर मुलाने वडीलाच्या डोक्यात दगडाने जबर वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना ८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास लोणी बु. (ता.रिसोड) येथे घडली. निवृत्ती पुंजाजी नरवाडे (६५) असे मृतकाचे नाव असून, गणेश निवृत्ती नरवाडे (२५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
मागील काही महिन्यात घडलेल्या खुनाच्या घटनांनी लोणी बु. गाव हादरले आहे. ८ जानेवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास निवृत्ती नरवाडे व त्यांचा वेडसर मुलगा गणेश हे दोघेही घरीच होते.
गणेशने अचानक वडिलांच्या डोक्यावर दगडाने प्रहार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने निवृत्ती नरवाडे जमिनीवर कोसळले.
या भयंकर प्रकाराला पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. या घटनेत निवृत्ती नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी गणेश हा वडिलाच्या मृतदेहाजवळच बसून होता. पोलीस पाटलाने घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला दिली.
त्यानंतर ठाणेदार भूषण गावंडे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.