पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली; त्यांनी हवी शाळा, पालकांची ना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:48+5:302021-02-13T04:39:48+5:30
कोरोनाच्या संकटातून काहीअंशी दिलासा मिळाल्यानंतर आणि लॉकडाऊनमधून शासनाने शिथिलता दिल्यानंतर आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या ...

पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली; त्यांनी हवी शाळा, पालकांची ना!
कोरोनाच्या संकटातून काहीअंशी दिलासा मिळाल्यानंतर आणि लॉकडाऊनमधून शासनाने शिथिलता दिल्यानंतर आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अद्याप इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही. दरम्यान, जी मुले मुळातच शिक्षणात हुशार आहेत, ती आता घरी राहून कंटाळली आहेत. त्यांना पूर्वीप्रमाणे पुन्हा शाळेत जायचे आहे. मित्रांना भेटायचे आहे, मधल्या सुटीत एकमेकांसोबत डबापार्टी करायची आहे; परंतु सध्यातरी ही बाब शक्य नसल्याची एकंदरित स्थिती आहे. मुले लहान असल्याने आणि शाळेत पाठवायचे झाल्यास ऑटो किंवा स्कूलबसशिवाय अनेकांकडे पर्याय नसल्याने पालकांमधूनही मुले शाळेत पाठविण्यास ना असल्याचे दिसून येत आहे.
..................
कोट :
मी खूप दिवसांपासून घरी राहून कंटाळलो आहे. आता टी. व्ही. पण नाही बघावा वाटत. आई-बाबा मोबाईलवर जास्त खेळू देत नाहीत. आता मला शाळेत जायचे आहे. शाळेतील मित्रांना भेटायचे आहे. खूपखूप मज्जा करायची आहे.
- सार्थक बनसोड
पहिलीचा विद्यार्थी
..............
मोठ्या दादाची शाळा सुरू झाल्याने माझ्यासोबत खेळायला आता कोणीच नाही. मला पण शाळेत जायचे आहे; पण आई-बाबा पाठवत नाहीत. घरी ‘ऑनलाईन क्लास’ करून काही समजत नाही. शाळा कधी सुरू होणार ?
- अजिंक्य मोरे, दुसरीचा विद्यार्थी
.............
शाळा बंद असल्याने खूप दिवसांपासून घरीच राहावे लागत आहे. काही दिवस खेळण्याची मजा आली; पण आता खूप कंटाळा आला आहे. आई-बाबा कुठे फिरायला पण बाहेर नेत नाहीत. शाळेत शिकवलेले समजते आणि खेळायला पण मिळते. आता मला शाळेत जायचे आहे.
- स्नेहल कावरखे
तिसरीची विद्यार्थिनी
...........
खूप दिवसांपासून ‘ऑनलाईन क्लासेस’ सुरू असून शिकवलेले सगळे समजत आहे. आता शाळा सुरू झाली तरी तीन महिनेच असणार आहे. त्यापेक्षा शाळा सुरूच करू नये. माझी सध्याच शाळेत जाण्याची इच्छा नाही.
- यश शिंदे
चौथीचा विद्यार्थी
................
पालकांना चिंता...
मुले लहान आहेत. त्यामुळे कुठलीही रिस्क घ्यायची मन:स्थिती नाही. तसेही ऑनलाईन वर्ग सुरू असून मुलांना शिक्षण मिळत आहे. त्यामुळे सध्यातरी मुलीला शाळेत पाठविण्याची इच्छा नाही.
- आकाश आडे
..............
कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे तुलनेने वयाने कमी असलेली मुले शाळेत कशी पाठवावी. आता नव्या शैक्षणिक सत्रापासूनच शाळा सुरू व्हाव्यात.
- संदीप चिखलकर
...............
पहिली ते चौथीच्या शाळा सध्या सुरू व्हायला नको. मुले लहान असल्याने बाहेर पडल्यास ते सुरक्षित राहतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय व्हायला नको.
- पवन राजगुरू
...............
मुलांना ऑटो किंवा स्कूलबसमधूनच शाळेत पाठवावे लागणार आहे. ती मंडळी कोरोनाविषयक खबरदारी घेईलच, याची काय शाश्वती? त्यामुळे तुर्तास मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी नाही.
- विशाल कोकाटे
...........................
२५३ - जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या शाळा
३१०० - विद्यार्थी संख्या