कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्तीप्रकरणी सात लोकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST2021-02-13T04:40:21+5:302021-02-13T04:40:21+5:30
तोंडगाव येथील श्रीकृष्ण विद्यालयात २०११ ते २०१६ या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत शिक्षण उपसंचालकांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी ...

कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्तीप्रकरणी सात लोकांवर गुन्हा दाखल
तोंडगाव येथील श्रीकृष्ण विद्यालयात २०११ ते २०१६ या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत शिक्षण उपसंचालकांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार, सदर शाळेतील कर्मचारी व तत्कालीन मुख्याध्यापकाने संगणमत करून कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्ती केल्या. या माध्यमातून ६ लाख ३४ हजार ७९३ एवढी रक्कम वेतन व मानधनापोटी उचलून शासनाची आर्थिक फसवणूक केली. सदर कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी संस्थेच्या सचिवांनी नागपूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी व त्याची एक प्रत न्यायालयास सादर करावी, असे आदेश देण्यात आले. त्यावरून ११ फेब्रुवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी रमेश दामोधर तांगडे यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून नितीन रमेश राऊत, अशोक ज्ञानबा भिसडे, अमोल माणिक गोटे, विकास बळीराम मोरे, गणेश सुरेश गोटे, सुनील कुंडलिक साबळे आणि सुभाष कचरू अंभोरे (सर्व रा. तोंडगाव, ता. वाशिम) अशा सात लोकांवर भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.