उमेदवारीसोबतच प्रतिस्पध्र्यांची मतं तोडण्यासाठी ‘फिल्डिंग’!
By Admin | Updated: August 20, 2014 23:07 IST2014-08-20T23:07:45+5:302014-08-20T23:07:45+5:30
निवडणुकीची दिनांक अद्याप घोषित झाली नसली तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

उमेदवारीसोबतच प्रतिस्पध्र्यांची मतं तोडण्यासाठी ‘फिल्डिंग’!
वाशिम : वाशिम-विधानसभा निवडणुकीची दिनांक अद्याप घोषित झाली नसली तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी एकीकडे 'फिल्डिंग' लावली असून, दुसरीकडे प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवारांचा अंदाज घेत त्यांच्या मतांचे विभाजन करण्याच्या दृष्टिकोणातून डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रमुख पक्षातील नेत्यांचे गत आठ दिवसांपासून भेटीगाठीचे सत्र सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील युती आणि आघाडीतील घटक पक्षांमधील इच्छूक उमेदवार अद्याप घोषित झाले नाहीतच त्यात सर्वच पक्ष मतदारसंघ आपल्या पक्षाकडे देण्यासंदर्भात आग्रही दिसून येत आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे २00९ च्या निवडणुकीत होती तीच व्यवस्था कायम असल्याचे मान्य करून कार्यकर्ते आणि नेते कामाला लागले आहेत. त्या दृष्टिकोणातून अनेक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या मुलाखतीचे कार्यक्रम आटोपले तर काहींचे आहेत. आता निवडणुकीच्या घोषणेसोबतच उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा सर्वच पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना आहे. त्यापूर्वी जिल्ह्यात इच्छुकांनी आपलेच तिकीट पक्के समजून मतदारसंघात काम करणे सुरू केले आहे. मतदारसंघातील प्रभावशाली कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटी घेऊन आपले तिकीट कसे पक्के झाले आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी असल्याचे साकडे घालणे सुरू आहे. या गाठीभेटीतूनच आपला प्रतिस्पर्धी कोण राहील, याचा अंदाज घेऊन त्याच्या मतांचे विभाजन करण्यासाठी कोणते डावपेच आखता येईल, याबाबत चर्चा सुरू आहे. वाशिम मंगरूळपीर मतदारसंघात वाशिम व मंगरूळपीर तालुका येत असल्याने या भागातील बलशाली नेत्यांना यासाठी कामाला लावले जात आहे. हाच प्रकार कारंजा व रिसोड विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्येही नेत्यांनी कार्यकर्ते शोधून त्यांना प्रतिस्पध्र्यांची मतं कमी करण्याच्या दृष्टिकोणातून कामाला कसे जुंपता येईल, याबाबत डावपेच आखणे सुरू केले आहे.