गृहरक्षक दल समस्यांच्या फे-यात
By Admin | Updated: December 23, 2014 00:15 IST2014-12-22T23:51:23+5:302014-12-23T00:15:57+5:30
वाशिम जिल्हा समादेशकाचे पद रिक्त; मुख्यालयाच्या इमारतीला जागा नाही, कर्मचा-यांची वाणवा.

गृहरक्षक दल समस्यांच्या फे-यात
वाशिम : सार्वजनिक उत्सव असो, निवडणूका असो अथवा मानव निर्मित आपत्ती प्रत्येक वेळी पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची धुरा सांभाळणारे जिल्ह्यातील गृहरक्षक दल आजमितीला लालफितशाहीत अडकले आहेत. सन २0१0 मध्ये निर्माण झालेल्या येथील गृहरक्षक दलाच्या कार्यालयाला इमारत मिळू शकली नाही. कार्यालयीन कर्मचार्यांची पदे, प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य आदी बाबींचा येथे दुष्काळ पडला आहे.
सन १९९८ ला अकोला जिल्ह्याचें विभाजन होऊन वाशिम हा नवा जिल्हा निर्माण झाला. त्यामुळे स्वाभाविकच जिल्हास्तरावर आवश्यक असणारी कार्यालये येथे थाटण्यात आली. गृहरक्षक दलाचे मुख्यालय मात्र याला अपवाद ठरले. सन २0१0 पर्यंत जिल्ह्यातील गृहरक्षक दलाचा कारभार अकोल्यातून चालायचा. सन २0१0 ला येथे कार्यालय सुरू करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे येथील जिल्हा समादेशाचा पदभार सोपविण्यात आला होता. गृहरक्षक दलाच्या येथील कार्यालयाला तब्बल चार वर्षापासून कायमस्वरूपी समादेशक मिळाले नाहीत. सद्यस्थितीत प्रभारी पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. वाशिमच्या होमगार्डाची जबाबदारी आहे. वाशिम जिल्हयात सद्यस्थितीत ३८५ गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्य बजावत असून यामध्ये २0४ पुरुष तर १८१ महिलांचा समावेश आहे. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलाच्या एका खोलीत सद्या गृहरक्षक दलाचे कार्यालय सुरू आहे. गृहरक्षक दलाला ईमारत तथा प्रशिक्षणासाठी जागा नसल्यामुळे कर्तव्य बजावणार्या गृहरक्षकांना अनेक समस्या भेडसावत आहे.