परीक्षा देऊन उत्तीर्ण होणारेच आयटीआय प्रवेशाला मुकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST2021-08-22T04:44:16+5:302021-08-22T04:44:16+5:30

वाशिम : यंदा मूल्यमापन आधारित निकालामुळे दहावीच्या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले असून, या गुणांमुळेच विद्यार्थ्यांना आयटीआयसारख्या तांत्रिक ...

Fear of dropping out of ITI admission only after passing the exam | परीक्षा देऊन उत्तीर्ण होणारेच आयटीआय प्रवेशाला मुकण्याची भीती

परीक्षा देऊन उत्तीर्ण होणारेच आयटीआय प्रवेशाला मुकण्याची भीती

वाशिम : यंदा मूल्यमापन आधारित निकालामुळे दहावीच्या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले असून, या गुणांमुळेच विद्यार्थ्यांना आयटीआयसारख्या तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत तुलनेत अधिक संधी प्राप्त झाली आहे. या प्रकारामुळे गतवर्षी परिश्रम घेऊन प्रत्यक्ष परीक्षा देत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांवर आयटीआयच्या प्रवेशात अन्याय होत असल्याचे दिसते. त्यामुळे गतवर्षीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे.

सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात राज्यभरातील कोणत्याही शाळेत दहावीचे वर्ग भरले नाहीत. नंतर शासनाने दहावीची परीक्षा रद्द करून मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल लावण्याचे निर्देश दिले. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुद्धा देण्याचा त्रास घ्यावा लागला नाही. आता प्रत्यक्ष यातील बहुसंख्य विद्यार्थी खरोखर प्रतिभावान आणि आयटीआयच्या प्रवेशास पात्र असतीलही, परंतु मूल्यमापन पद्धतीचा काही विद्यार्थ्यांना लाभ झाला, असे म्हणणेही वावगे ठरू नये. मूल्यमापन पद्धतीच्या आधारे लावलेल्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रवेशप्रक्रियेत अधिक गुणांमुळे संधी अधिक मिळत आहे, तर गतवर्षी प्रत्यक्ष परीक्षा देऊन परिश्रमाने गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होत आहे. आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसत आहे. त्यामुळे आयटीआयच्या प्रवेशापासून वंचित होण्याची वेळ लाखो विद्यार्थ्यांवर आली आहे.

--------

भीतीपोटी लाखावर विद्यार्थ्यांनी अर्जच केले नाहीत.

मूल्यमापन आधारित निकालामुळे यंदा उत्तीर्ण झालेले आणि गतवर्षी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांत गुण आणि गुणवत्तेत मोठी तफावत निर्माण झाल्याचे दिसते. अशात आयटीआय प्रवेश प्रक्रियेत यंदाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच अधिक संधी असून, आपणास प्रवेश मिळणार नाही, अशी भीती गतवर्षी परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशासाठी अर्जच केले नसल्याची माहिती आहे.

--------------------------

कोट : आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा कोणताही बदल करण्यात येणार नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवत्तेवर आधारित पद्धतीनेच आयटीआयचे प्रवेश निश्चित होतील. गतवर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थात २०१९-२० मध्ये परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय नाही.

- विनोद बोंदरे,

अवर सचिव, कौशल्य विकास विभाग

महाराष्ट्र शासन

--------------------------

कोट : गतवर्षी मी दहावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण प्राप्त केले असून, आयटीआयला प्रवेश घेण्याची माझी इच्छा आहे. परंतु यंदा मूल्यमापन पद्धतीमुळे दहावीच्या निकालाचा टक्का वाढला. तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुणही मिळाले. त्यामुळे आम्हांला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असल्याने मी अर्ज करण्याच्या मन:स्थितीत नाही.

-ऋतिका जाधव,

दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी

-----------------

कोट : मी प्रत्यक्ष परीक्षा देऊन दहावीत ६२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. आयटीआयला प्रवेश घेण्याची माझी इच्छा आहे, परंतु यावर्षी मूल्यमापन पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे आम्हांला आयटीआयला प्रवेश मिळण्याची शाश्वतीच राहिली नाही.

-कृष्णा बेलखेडे,

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी

Web Title: Fear of dropping out of ITI admission only after passing the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.