३२२६ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST2021-01-16T04:45:03+5:302021-01-16T04:45:03+5:30
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ ...

३२२६ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद!
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा जिल्ह्यातील एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. दरम्यान, १६३ पैकी ११ ग्रामपंचायतींनी सर्वसंमतीने ‘अविरोध’ची भूमिका घेऊन प्रत्यक्ष निवडणूकीतून यशस्वी माघार घेतली. त्यामुळे १५ जानेवारी रोजी १५२ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक पातळीवरील पॅनलप्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यात कुणाची सरशी होते आणि कुणाची गच्छंती, हे १८ जानेवारीला निकालाच्या दिवशी कळणार आहे. त्यामुळे आता या दिवसाकडे ग्रामीण मतदारांचे लक्ष लागून आहे.
....................
५३९ मतदान केंद्रांवर झाले मतदान
१२३३ जागांसाठी १५२ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीत ५३९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २ लाख ८८ हजार ६९१ मतदारांपैकी दुपारी ४ वाजतापर्यंत १ लाख ७७ हजार २१३ मतदारांनी (६१.३९ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता.
..................
वयोवृद्ध मतदारांनी वेधले लक्ष
गावगाड्यातील प्रमुख निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवमतदारांपासून वयोवृद्धांपर्यंतच्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वाकद (ता.रिसोड) येथील ९९ वर्षीय हासीना बी आजीस खान या आजीबाईचाही त्यात समावेश होता. वयोवृद्ध मतदारांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.
.................
मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त
मतदान केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. ठिकठिकाणचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह इतर पोलीस व गृहसुरक्षा दलाचे कर्मचारी मिळून १५३२ कर्मचाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सांभाळली. त्यांना दोन एसआरपी आणि एका क्यूआरटी प्लाटूनने सहकार्य केले.
..........................
आता प्रतीक्षा निकालाची
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता तालुकास्तरावर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्याची प्रतीक्षा उमेदवारांसह मतदारांनाही लागून आहे.