विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

By Admin | Updated: August 27, 2014 00:00 IST2014-08-26T22:44:28+5:302014-08-27T00:00:09+5:30

इंझोरी येथील घटना

Farmer's Suicide by Poisoning Prison | विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

इंझोरी : नापिकीला कंटाळून येथील एका ३२ वर्षीय शेतकर्‍याने २४ ऑगस्टच्या रात्री स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार मृतक शेतकर्‍याचे नाव गोपाल मारोती लटके असे आहे. त्यांच्याकडे वडिलोपाजिर्त ११ एकर शेती होती; पण ती अडाण धरणाच्या निर्मितीत गेली. त्यापैकी अंदाजे २ एकर शेती पाण्याखाली येत नसल्याने मारोती लटके मागील बर्‍याच वर्षांपासून वहिती करतात. यावर्षी निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांना तिबार पेरणी करावी लागली. तसेच पीक जमिनीवर आल्यानंतर जंगली प्राण्यांनी धुडगूस घातला. डोळ्यादेखत सदर शेतकर्‍याचे अतोनात नुकसान झाले. शेतात लावलेला पैसा निघणे कठीण झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले. बुडीत क्षेत्रात जमीन असल्याने बँकही कर्ज देत नाही त्यातच डोक्यावर सावकाराचे कर्ज, वन्यप्राण्यांचा त्रास या सर्व बाबीला कंटाळून त्यांनी २४ ऑगस्टला विष प्राशन केले. त्यांना लगेच कारंजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. येथे प्रथमोपचारानंतर त्यांना अकोला रवाना करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, वडील, चार बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Farmer's Suicide by Poisoning Prison