शेतकऱ्यांना आता घरपोच खत, बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST2021-04-28T04:44:34+5:302021-04-28T04:44:34+5:30
यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसत आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने खते, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना अडचणी ...

शेतकऱ्यांना आता घरपोच खत, बियाणे
यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसत आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने खते, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून खतांसह बियाण्याचे घरपोच वाटप केले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनीदेखील घरच्या घरीच बियाणे उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले. सोयाबीन हे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी नवीन बॅगचे बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही. मागच्या वर्षीचे सोयाबीन उगवण शक्ती तपासून पेरता येते. उगवण शक्ती ७० टक्के असल्यास ३० किलो बियाणे एकरी वापरावे व ६५ टक्के उगवण असल्यास ३५ किलो बियाणे एकरी वापरावे. उगवण शक्ती कशी तपासावी, याबाबत आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषिमित्र तसेच प्रगतशील शेतकरी यांच्याद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविण्याची मोहीम खरीप हंगामपूर्वी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. उगवण शक्ती तपासण्याबाबत शंका असल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.
काेट
कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी बाजारात येण्याचे टाळा, आपणास लागणारे
बियाणे, खताची मागणी कृषी विभागाच्या पोर्टलवर नोंदविल्यास घरपोच खते आणि बी बियाणे दुकानदारामार्फत पोहोचवण्यात येईल. खते व बियाण्याची मागणी कशी करावी, यासाठी कृषी सहाय्यक, कृषिमित्र, प्रगतशील शेतकरी यांची मदत घ्यावी.
शशीकिरण जांभरुणकर,
तालुका कृषी अधिकारी
मालेगाव