नैसर्गिक संकटापुढे शेतकरी हतबल
By Admin | Updated: August 2, 2014 23:22 IST2014-08-02T23:22:52+5:302014-08-02T23:22:52+5:30
तिबार पेरणीचे संकट; आर्थिक मदतीसाठी शेतकर्यांचा टाहो

नैसर्गिक संकटापुढे शेतकरी हतबल
कारंजालाड : पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधीत होत असतानाही अद्यापपर्यंत कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. मंगरूळपीर : तालुक्यात ९0 टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी अद्यापपर्यंत जोरदार पाऊस पडला नाही. बहुतांश भागातील पेरण्या उलटल्याने शेतकर्यांनी दुबार नंतर तिबार पेरण्या सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.निर्सगाच्या खेळ खंडोब्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून , शासनाने दुबार-तिबार पेरणी झालेल्या क्षेत्राचा सर्व्हेक्षण करूण मदत करावी अशी मागणी होत आहे. यावर्षी तालुक्यातील शेतकर्यांनी अत्यल्प पावसावरच पेरण्या सुरू केल्या होत्या. त्यामुळे जुलै महिण्याच्या प्रारंभालाच पेरण्या उलटल्या. मात्र प्रशासनाने कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. मग पुन्हा पावसाचे आगमन झाल्यानंतर पेरण्यांनी जोर धरला. परंतु आवश्यक तेवढय़ा प्रमाणात निसर्गाने साथ दिली नाहीे व पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे पेरलेले बियाणे उगवले नाही. पुन्हा तिबार पेरण्याचे संकट शेतकर्यावर ओढावल्या गेले. तालुक्यात पेरण्या झाल्याचे चित्र दिसत असले तरी वारंवार पेरण्या करण्याचा प्रसंग बळीराजा वर येत आहे. आतापर्यंतच्या पावसामुळे तालुक्यावरील जलसंकट टळले नाही. नदय़ा अद्यापही तहानलेल्या आहेत तर लहान मोठय़ा धरणाच्या पाण्याच्या पातळीत किंचीतही वाढ झाल्याचे दिसत नाही. पावसाचे वातावरण तयार दिसत असेल पण दाटलेले आभाळ हुलकावणी देत आहे.गेल्या वर्षीच्या पर्जन्यवृष्टीने आजही शेतकरी सावरला नाही तोच यंदा कोरड्या दुष्काळाची झळ बसणार की काय? अशी परिस्थिती दिसायला लागली आहे. निर्सगाच्या प्रकोपाने तालुक्यातील शेतकर्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी होणार की काय हे येणारा काळ सांगेल. मानोरा : यावर्षी पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. काही शेतकर्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. काही प्रमाणात आलेल्या पावसाने पेरणीची योग्य वेळ जाण्याच्या स्थितीत असल्याने सर्वांंनीच पेरण्या आटोपल्या. पण पाऊस येत नसल्याने काही शेतकर्यांना तिबार तर बहुतांश शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकर्यामधून होत आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकर्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागत आहे. पावसाच्या विलंबाने सद्यस्थितीत पावसाअभावी निघालेली पीके कोमजत असून त्यांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे तर काही शेतकर्यांच्या शेतातील पिकांची बियाणे जमिनीच्यावर निघण्याच्या स्थितीत आहे. मात्र त्याला थोडाफार पावसाची आवश्यकता आहे. आकाशात ढग तयार होतात. मात्र पाऊस येत नसल्याने पावसाविना पीक जमिनीतून कसे बाहेर येणार हा प्रश्न शेतकर्यांसमोर पडला आहे. शासनाने शेतकर्यांना आर्थिक़ धीर द्यावा अशी मागणी होत आहे
. ** यावर्षी वाशिम जिल्ह्यात अल्पशा पावसामुळे शेतकर्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीचा सर्व्हे करून त्यांना मदत करावी, अशी मागणी वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे यांनी ३१ जुलै रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
** मुंबईच्या मंत्रालयात त्यांनी मंत्री कदम यांची भेट घेऊन वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच वाशिम जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे त्यांच्यावर दुबार व तिबार पेरणीचे संकट आले. त्यामुळे सर्व्हे करून शेतकर्यांना हेक्टरी मदत करावी, असा आग्रह त्यांनी निवेदनातून धरला. या प्रसंगी मंत्री कदम यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकार्यांशी संपर्क करीत सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहे.