शेतकरी वर्गाची कांदा बीजोत्पादनाच्या माध्यमातून ‘करार शेती’कडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST2021-01-21T04:36:23+5:302021-01-21T04:36:23+5:30
भर जहांगीर परिसरामध्ये मागील काही वर्षांपासून शेती सिंचनाचा विचार करीत अनेक सिंचन तलाव निर्मिती करण्यात आली. त्यामुळे बहुतांश शेतकरी ...

शेतकरी वर्गाची कांदा बीजोत्पादनाच्या माध्यमातून ‘करार शेती’कडे वाटचाल
भर जहांगीर परिसरामध्ये मागील काही वर्षांपासून शेती सिंचनाचा विचार करीत अनेक सिंचन तलाव निर्मिती करण्यात आली. त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्गाने पारंपरिक पिकाऐवजी विविध खासगी बीजोत्पादन कंपन्यांसोबत करार शेती अवलंबविली आहे. बोरखेडी येथील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो़, भेंडी़, एरंडी, भोपळा, वांगी यासह अनेक भाजीवर्गीय पिकांच्या बीजोत्पादनासाठी करार पध्दतीने खासगी कंपन्यांसोबत उत्पन्न येण्याआधीच उत्पन्नाचे दर ठरवित करार पद्धतीने शेतीला प्रारंभ केलेला आहे. तर हल्ली केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या शेतीविषयक तीन कायद्यांना प्रखर विरोध केल्या जात असताना भर जहांगीर परिसरामध्ये हल्ली नव्याने कांदा बीजोत्पादन खासगी कंपन्यांसोबत करार पध्दतीने शेती केली आहे. यामध्ये पंचगंगा, भगवा कांदा जातीचा पेरा केलेला दिसत आहे. खासगी कंपनीसोबत पन्नास हजार रुपये प्रतिक्विंटल कांदा बियाण्याचा करार झालेला आहे. सदर कंपनीकडून लागवडीकरिता थेट पश्चिम महाराष्ट्रातून कांदा उपलब्ध केला आहे. याचे दर ३ हजार ते बत्तीशे रुपयापर्यंत आहेत. तर खासगी काही व्यापाऱ्यांनासुध्दा दोन हजार सातशे रूपये क्विंटल प्रमाणे लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कांदा खरेदी केला आहे. याचे ३० हजार रुपये क्विंटलप्रमाणे करार केला आहे. प्रति एकर तीन ते चार क्विंटल कांदा बीजोत्पादन होते.
..........
कांदा बीजाचे तीन लाख रुपये क्विंटल झाल्याने बहुतांश शेतकरी वर्ग कांदा बीज उत्पादन घेण्याकडे वळले आहेत. परंतु बाजारपेठेतील कांदा बीज दराचा अंदाज येत नसल्याने सदर कंपनीसोबत दर ठरवून करार करण्याला प्राधान्य दिले आहे.
- इंदरकुमार कोकाटे