शेतकरी मार्गदर्शन सभांचा निर्णय ‘तकलादू’!

By Admin | Updated: April 19, 2017 01:15 IST2017-04-19T01:15:21+5:302017-04-19T01:15:21+5:30

कृषी विभागाची उदासिनता : शासनाच्या अनेक योजनांपासून शेतकरी अद्याप अनभिज्ञ

Farmer's guidance meetings are decided! | शेतकरी मार्गदर्शन सभांचा निर्णय ‘तकलादू’!

शेतकरी मार्गदर्शन सभांचा निर्णय ‘तकलादू’!



वाशिम : केंद्र व राज्य पुरस्कृत कृषीविषयक योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक गुरुवारी जिल्हास्तरावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित करण्याचा निर्णय ७ मार्च २०१७ रोजी घेण्यात आला. मात्र, तेव्हापासून आजतागायत एकही सभा झालेली नाही. त्यामुळे सभांचा निर्णय पूर्णत: तकलादू ठरल्याची बाब समोर आली आहे.
कृषी विभागामार्फत दरवर्षी केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबविल्या जातात. त्यात विस्तार, फलोत्पादन व मृद संधारण, गुण नियंत्रण, सांख्यिकी आदिंचा समावेश आहे. विस्तार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकरिता विविध पिकांची पीक प्रात्यक्षिके घेतली जातात. याअंतर्गत कृषी विद्यापीठामार्फत संशोधित नवीन वाणांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात येते. कृषि निविष्ठा उत्पादन वाढीसाठी देण्यात येतात. याव्यतिरिक्त रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, बीबीएफ संयंत्र, पीक संरक्षण उपकरणे, एच.डी.पी.ई. पाईप, मिनी दालमिल, गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया सयंत्र, राज्यांतर्गत, राज्याबाहेर, परदेश अभ्यासदौरे, प्रशिक्षण कार्यक्रम आदी बाबींचा इच्छूक शेतकऱ्यांना शासनाकडील मार्गदर्शक सुचनेनुसार अनुदानाचा लाभ देण्यात येतो. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सामुहिक शेततळे, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ आदिंचा अनुदानावर लाभ देण्यात येतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत १०० टक्के अनुदानावर फळझाड लागवडीसाठी अनुदान दिले जाते. मृद संधारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर विहीर पुर्नभरण, नाला सरळीकरण व खोलीकरण, खोल सलग समतल चर, ढाळीचे बांध, सिंमेट नालाबांध, माती नालाबांध व गाळ काढणे ही कामे घेण्यात येतात.
तथापि, कृषी विभागाच्या याच महत्वाकांक्षी योजनांविषयी शेतकऱ्यांना इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर दर गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आत्मा सभागृहात मार्गदर्शन सभा आयोजित करण्याचा निर्णय ७ मार्चला घेण्यात आला. मात्र, तेव्हापासून एकदाही यासंदर्भातील सभा घेण्याचे औदार्य कृषी विभागाने दाखविलेले नाही.

सहाही तालुक्यांमध्ये आठवडाभर होणार होते सभांचे आयोजन
जिल्हास्तराप्रमाणेच तालुकास्तरावर देखील शेतकरी मार्गदर्शन सभांचे आयोजन केले जाणार होते. त्यानुसार, रिसोड तालुका कृषि अधिकारी यांच्या स्तरावर दर सोमवारी, मालेगाव तालुका कृषि अधिकारी दर मंगळवारी, मंगरूळपीर तालुका कृषि अधिकारी दर बुधवारी, मानोरा तालुका कृषि अधिकारी दर शुक्रवारी, कारंजा तालुका कृषि अधिकारी यांच्या स्तरावर दर शनिवारी मार्गदर्शन सभा होणार होती. परंतू जिल्हास्तराप्रमाणेच तालुकास्तरावरही कुठलीच सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याप्रती रोष व्यक्त होत आहे.

जिल्हाभरात कृषीविषयक मार्गदर्शन सभा घेण्याचा निर्णय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचाच होता. मात्र, मध्यंतरी उद्भवलेल्या काही तांत्रीक अडचणींमुळे एकही सभा अद्याप होवू शकली नाही. असे असले तरी यंदाच्या गुरूवारपासून सभांचे नियोजन केले जाईल.
- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Farmer's guidance meetings are decided!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.