स्वत:च चिता रचून शेतक-याने केली आत्महत्या

By Admin | Updated: November 30, 2014 00:23 IST2014-11-29T22:34:13+5:302014-11-30T00:23:03+5:30

अकोला जिल्हय़ातील हृदयद्रावक घटना; नापिकीमुळे उचलले पाऊल.

Farmers committed suicide due to self-styling | स्वत:च चिता रचून शेतक-याने केली आत्महत्या

स्वत:च चिता रचून शेतक-याने केली आत्महत्या

बाळापूर (अकोला): नापिकीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देणे अवघड झाल्याने एका अल्पभूधारक वृद्ध शेतकर्‍याने स्वत: चिता रचून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अकोला बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी घडली. काशिराम भगवान इंदोरे (७५) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. बाळापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मनारखेड येथील काशिराम इंदोरे यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यांना चार मुले आहेत. वय झाल्यानंतरही ते उदरनिर्वाहासाठी मुलांवर अवलंबून नव्हते. नातवंडांना अंगाखांद्यावर खेळविण्याच्या वयात स्वाभिमानी असलेले काशिराम स्वत: चार एकर शेती करून पत्नी शांताबाई (७0) व स्वत:ची गुजराण करीत होते. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे काशिराम यांना पिकाने दगा दिला. उत्पादनात प्रचंड घट आल्याने पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल झाला नाही. हाताशी असलेला पैसाही संपला. संपूर्ण वर्षभर उदरनिर्वाह कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या काशिराम यांनी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी ते शेतात गेले. तेथे तोडलेल्या लाकडांची चिता रचली व ती पेटवून दिली. त्यानंतर काशिराम यांनी धगधगत्या चितेवर झोपून या जगाचा निरोप घेतला. बाळापूर पोलिसांनी काशिराम यांचे पुत्र सारंगधर इंदोरे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

*नापिकीने फेरले काशिरामच्या आशेवर पाणी!

    चार मुले असतानाही मुलांच्या भरवशावर न राहता वय झाल्यानंतरही उदरनिर्वाहासाठी स्वत:च्या हिंमतीवर शेती करणार्‍या काशिराम इंदोरे यांना निसर्गापुढे हार पत्करावी लागली. काशीराम यांनी यावर्षी सोयाबीन व तूर पेरली होती. निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे सोयाबीन झाले नाही. तूर पिकावरही रोगराईचे सावट असल्यामुळे त्याचीही शाश्‍वती नाही. पीक होईल, या आशेवर उदरनिर्वाहासाठी उधार उसनवारी म्हणून घेतलेली रक्कम कशी फेडावी, या विवंचनेत काशिराम होते. शुक्रवारी दुपारी ते शेतात गेले. तेथे काम केल्यानंतर तोडलेली लाकडे व्यवस्थित रचली. ती पेटवून दिल्यानंतर ते चितेवर जाऊन झोपले. यात त्यांचा कोळसा झाला. सायंकाळ झाल्यानंतरही काशिराम घरी न परतल्यामुळे शोधाशोध केली असता, शेतातील प्रकार पाहून सर्वांना धक्काच बसला. एका स्वाभिमानी शेतकर्‍याची अशी अखेर झालेली पाहून नियतीही ओशाळली असणार एवढे मात्र नक्की.

Web Title: Farmers committed suicide due to self-styling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.