शेतकरी पेरणीसाठी सज्ज
By Admin | Updated: June 10, 2015 02:51 IST2015-06-10T02:51:40+5:302015-06-10T02:51:40+5:30
मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकरी सुखावला : वाशिम तालुक्यातील मशागतीची कामे पूर्णत्वाकडे.

शेतकरी पेरणीसाठी सज्ज
वाशिम : खरीप हंगामासाठी जिल्हय़ातील बहुतांश शेतकर्यांनी रखरखत्या उन्हातच पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु केली होती. ८ जून रोजी झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असून, पेरणीसाठी सज्ज झाला आहे. अनेक शेतकर्यांनी पेरणीसाठी शेत तयार केले असून, पावसाची प्रतीक्षा करीत आहे. जिल्हय़ातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यात ८ जून रोजी झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असून, अनेकांनी ९ जून रोजी सकाळपासूनच शेतात हजेरी देऊन पेरणीपूर्व कामे आटोपली आहेत. काही शेतकर्यांनी उन्हाळय़ातच शेती तयार केली. ते बी- बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी धावपळ करीत असून, काही शेतकरी ८ जून रोजी झालेल्या पावसानंतर ९ जून रोजी सकाळपासूनच शेतात जावून पेरणीसाठी शेतातील कामे पूर्ण करताना दिसून आला. गतवर्षी कधी दुष्काळी तर कधी अतवृष्टीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते. पेरणी केलेला खर्चही शेतकर्यांच्या हाती न आल्याने शेतकरी अडचणीत आला होता. यावर्षी मृगनक्षत्राचा पाऊस वेळेवर पडल्याने आनंद व्यक्त करीत आहे. गतवर्षीचे सर्व संकटे विसरुन शेतकरी नव्या जोमाने, नव्या दमाने शेतीच्या मशागतीस भिडला आहे. बहुतांश शेतकर्यांनी आधुनिक तंत्नज्ञानाची कास धरून ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरणी करून जास्त वेळ व जास्त घाम न गाळता शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली आहे तर अल्पभूधारक शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत पूर्ण करुन पावसाची प्रतीक्षा करीत आहे. जिल्हय़ात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड दरवर्षी होते, याहीवर्षी हेच पीक मोठय़ा प्रमाणात घेतल्या जाणार असल्याचे चिन्ह आहेत. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने सोयाबीन बियाण्यांसाठी मात्र शेतकर्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. बाजारात सोयाबीन बियाणे मिळत नसल्याने घरगुती बियाण्यांवर शेतकर्यांचा जोर असून कृषी विभागाच्यावतीनेही घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन केल्या जात आहे.