कारंजात आढळली शंभर रुपयाची बनावट नोट
By Admin | Updated: January 17, 2017 22:52 IST2017-01-17T22:52:39+5:302017-01-17T22:52:39+5:30
कारंजा येथे प्रज्ञेश रुपेश पाटील या युवकाकडे शंभर रुपयाची बनावट नोट मंगळवार १७ जानेवारी रोजी आढळून आली. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारंजात आढळली शंभर रुपयाची बनावट नोट
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 17 - जिल्ह्यातील कारंजा येथे प्रज्ञेश रुपेश पाटील या युवकाकडे शंभर रुपयाची बनावट नोट मंगळवार १७ जानेवारी रोजी आढळून आली. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील काजीपुरा येथील फिर्यादी निसार अली रजा अली या इसमाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे, की प्रज्ञेश रुपेश पाटील राहणार दारव्हा याने १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या पानटपरीवरून मसाला पान घेतले. त्याचे पैसे देण्यासाठी त्याने शंभर रुपयांची ८पीएफ ९ जे ०४७४ क्रमांकाची नोट दिली. फिर्यादीने त्याला उर्वरित पैसेही परत केले; परंतु ही नोट नंतर निरखून पाहली असता फिर्यादीला ती बनावट असल्याची शंका आली. त्यावरून त्यांनी कारंजा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्या विरोधात कलम ४८९ ब, क, ४२० भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास कारंजा शहर पोलिस करीत आहेत.