दुष्काळातही आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर!
By Admin | Updated: May 24, 2016 02:04 IST2016-05-24T02:04:42+5:302016-05-24T02:04:42+5:30
वाशिम जिल्ह्यातील ३१ आत्महत्या प्रकरणापैकी १0 अपात्र; ४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीत.
_ns.jpg)
दुष्काळातही आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर!
विवेक चांदूरकर / वाशिम
गत तीन वर्षांपासून जिल्हय़ात दुष्काळ असून, शेती व्यवसाय पूर्णत: मोडकळीस आला आहे; मात्र त्यानंतरही शासन शेतकर्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर देत आहे. जिल्हय़ात २0१६ साली आतापर्यंत झालेल्या ३१ आत्महत्यांपैकी १0 आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, ४ आत्महत्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
जिल्हय़ात तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ आहे. पावसाचे प्रमाण घटले असून तीन वर्षामध्ये सरासरीच्या ५0 टक्के कमी पाऊस पडला आहे. अल्प पाऊस व पावसात पडत असलेल्या दडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. गतवर्षी पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. दोन वेळच्या जेवणाचीही आबाळ होत आहे. त्यातच जिल्हय़ात उद्योगधंदे नसून, रोजगार हमी योजनेची कामेही ठप्प आहेत. त्यामुळे शेतकर्यांना रोजगारही उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकर्यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. जानेवारी २0१६ पासून आतापर्यंत पाच महिन्यातच ३१ शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी महिन्यात ९ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी दोन शेतकर्यांच्या आत्महत्येची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ६ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, यापैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले. मार्च महिन्यात ८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून, यापैकी अध्र्या म्हणजेच ४ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्यांनी आत्महत्या केला असून, यापैकी तीन प्रकरणे चौकशीत आहेत. तर मे महिन्यात एका शेतकर्याने आत्महत्या केली असून, सदर प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे. सर्वात जास्त आत्महत्या जानेवारी महिन्यात झाल्या.