पाणीटंचाई आणणार तोंडाला फेस
By Admin | Updated: August 26, 2014 23:58 IST2014-08-26T22:52:01+5:302014-08-26T23:58:12+5:30
विधानसभेच्या कुरूक्षेत्रात मतदारांसमोर उमेदवार होणार हतबल

पाणीटंचाई आणणार तोंडाला फेस
वाशिम: जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दरवर्षीच जाणवणारी पाणीटंचाई यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांसह त्यांच्या सर्मथकांच्या तोंडाला फेस आणण्याची शक्यता बळावली आहे.
ग्राम विकासाची नाना स्वप्ने उराशी बाळगणार्या जिल्हावासीयांचा अद्याप तरी स्वप्नभंगच झालेला आहे. हतबल लोकप्रतिनिधी तथा निगरगट्ट प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गत १५ वर्षातही जिल्हा विकासाचे बाळसे धरू शकला नाही. ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये अद्याप पक्के रस्ते नाहीत. सांडपाण्याचे नियोजन नाही. घाणीचे साम्राज्य तर नागरिकांच्या पाचविलाच पुजले आहे. या व्यतिरिक्त गढूळ पाणी, जलवाहिनीला गळती आदी प्रश्नांनी त्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. सर्वाधिक भीषण समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची. जिल्ह्यातील निम्म्या गावातील जनता दरवर्षीच पाणी टंचाईचे चटके सोसत आली आहे. कधी पाणी नाही म्हणून तर कधी वीज भारनियमनाच्या पदराआड नागरिकांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरण्याचे नावच घेत नाही.. काही गावांमध्ये उन्हाळाच नव्हे तर पावसाळा व हिवाळ्यातही पाणी टंचाईचे तांडव सुरू असते. परिणामी पाणीटंचाईच्या दाहकतेमध्ये येथील नागरिक होरपळत असतात. तथापि, संबंधित लोकप्रतिनिधींना पाणी टंचाईकडे लक्ष द्यायला वेळ दिसून येत नाही. सध्या निवडणुकीचा फिवर आहे. त्यामुळे झाडुन पुसून सर्व राजकारणी मतांची झोळी घेऊन जनता जनार्दनासमोर या समस्यांकडे हात पसरविणार आहेत.
काही राजकारण्यांनी यापूर्वी सत्तेची फळे चाखली आहेत. तथापि, या समस्यांचे निराकरण करण्याची हिम्मत त्यांच्यातील एकही ह्यमाईचा लालह्ण दाखवू शकला नाही., हे जिल्हावासीयांचे दुर्दैव आहे. प्रत्येक वेळी जात-पात, पैसा-अडका, धर्म-पंथ यासारख्या शस्त्रांनी मतदारांना ह्यइमोशनल ब्लॅकमेल ह्ण करायचे किंवा आश्वासनांच्या पावसात मतांचे भरघोस पीक घेऊन डाव साधायचा, हेच कारस्थान नाकर्त्या लोकप्रतिनिधींनी केले आहे. यावेळी मात्र हवेने दिशा बदलली आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रचाराला येणार्या उमेदवाराला जाब विचारण्याची मानसिकता मतदारांनी करून ठेवली आहे. त्यामुळे उमेदवार हैराण होणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. उमेदवारांच्या सर्मथकांनाही मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत.