सिंचन विहिरीच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ !
By Admin | Updated: March 26, 2017 13:30 IST2017-03-26T13:30:30+5:302017-03-26T13:30:30+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला ७०० सिंचन विहिरींचा लक्ष्यांक प्राप्त झाला असून, आता २९ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

सिंचन विहिरीच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ !
वाशिम : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला ७०० सिंचन विहिरींचा लक्ष्यांक प्राप्त झाला असून, आता २९ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याला मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी दिली.
अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनातर्फे विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. आता शासनाने या योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे केले असून, विहिरींचे अनुदान अडीच लाख रुपये केले आहे. वाशिम जिल्ह्याला ७०० विहिरींचा लक्ष्यांक प्राप्त झाला. विहिरीबरोबरच मोटारपंप व स्प्रिंकलर पाईपसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये, वीजजोडणीसाठी १० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. सदर योजनेकरिता अनूसचित जातीतील शेतकऱ्यांची निवड प्राधान्यक्रमाणे करण्यात येणार आहे. २४ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. मध्यंतरी आॅनलाईन सातबारा व आठ अ आदी कागदपत्र काढण्यासाठी आॅफलाईन संकेतस्थळाचा व्यत्यय निर्माण झाल्याने पात्र शेतकऱ्यांना अर्ज सादर करता आले नाहीत. या पृष्ठभूमीवर अर्जाला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आता २९ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती कृषी सभापती विश्वनाथ सानप यांनी दिली.