द्रूतगती मार्ग हस्तांतरण प्रक्रिया अडकली लालफितशाहीत!
By Admin | Updated: April 24, 2015 02:03 IST2015-04-24T02:03:41+5:302015-04-24T02:03:41+5:30
नागपूर - औरंगाबाद द्रूतगती मार्ग सा.बां.विभागाकडे झाला वर्ग.

द्रूतगती मार्ग हस्तांतरण प्रक्रिया अडकली लालफितशाहीत!
मंगरूळपीर : नागपूर-औरंगाबाद द्रूतगती मार्ग महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे; मात्र हस्तांतरित प्रक्रिया लालफितशाहीत अडकल्याने द्रूतगती मार्गाच्या दुरूस्तीचा प्रश्न रेंगाळला आहे. सदर रस्ता डागडुजीचा प्रस्ताव सा.बां. विभागाकडे तयार असल्याची माहिती आहे. नागपूर-औरंगाबाद या मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. ५ नोव्हेंबर २0१४ रोजी सदर द्रूतगती मार्ग रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. जिल्हय़ातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव व रिसोड या ४ तालुक्याच्या सा.बां. विभागाच्या हद्दीत जवळपास ११३.४ किमी. अंतर रस्ता ताब्यात येणार आहे. या मार्गावरील किरकोळ दुरूस्ती मोठय़ा प्रमाणावर रखडल्या असून, खड्डय़ांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दूतगती मार्ग वर्ग झाल्यावर हस्तांतरीत प्रक्रिया झपाट्याने होणे अपेक्षीत होते; परंतु ५ महिने उलटून गेले तरी सदर प्रक्रिया पार पडली नाही. हस्तांतरीत प्रक्रियेमुळे मार्गाच्या दुरूस्तीला विलंब होत आहे. हस्तांतरीत प्रक्रिया पार पडल्यानंतर नागपूर ते औरंगाबाद द्रूतगती मार्गावरील तर्हाळा, शेलूबाजार, लाठी वळण रस्त्याचे अपुर्ण अवस्थेत पडलेले बांधकाम मार्गी लागणे आवश्यक आहे. तर्हाळा नजिकच्या अरूंद पुलाजवळ २२ एप्रिलपर्यंत अपघातात तिघांचा बळी गेला आहे. हस्तांतरीत प्रक्रिया निकाली केव्हा निघते, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.