कर्मचा-यांच्या प्रवासभत्त्याचा ‘वनवास’ संपुष्टात
By Admin | Updated: February 4, 2016 01:19 IST2016-02-04T01:19:35+5:302016-02-04T01:19:35+5:30
वन विभागातील गस्तीवरच्या कर्मचा-यांना १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मिळणार.

कर्मचा-यांच्या प्रवासभत्त्याचा ‘वनवास’ संपुष्टात
संतोष वानखडे / वाशिम: वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून गस्तीवर राहणार्या वनविभागाच्या कर्मचार्यांना फेब्रुवारीपासून १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळपास ५0 कर्मचार्यांना याचा लाभ होणार आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला; मात्र असे करताना त्याचे वन संवर्धन व संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने वनक्षेत्रात घट येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले ३३ टक्के वनक्षेत्र वाशिमसह महाराष्ट्र आणि देशातही नाही. यापुढे वनक्षेत्रात घट येणार नाही, याची दक्षता म्हणून वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील मेडशी, वाशिम व कारंजा परीक्षेत्रात बर्यापैकी वनराई आहे. या वनांचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागातील वनपरीक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांवर सोपविली आहे. वनांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील कर्मचार्यांना गस्तीवर राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय ते गस्त या दरम्यानचा प्रवास या कर्मचार्यांना स्वखर्चाने करावा लागत असल्याने भुर्दंड सोसावा लागत होता. याचा परिणाम साहजिकच गस्तीवरही होत असे. गस्त करणार्या वन कर्मचार्यांना कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी शासनस्तरावर विविध संघटनांनी लावून धरली. या मागणीची दखल म्हणून फेब्रुवारी २0१६ पासून वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील कर्मचार्यांना प्रतिमाह १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मंजूर झाला असून, वाशिम जिल्ह्यातील जवळपास ५0 कर्मचार्यांना याचा फायदा होणार आहे. कायम प्रवास भत्त्याच्या रकमेचा कुणी गैरफायदा घेणार नाही, यासाठी सहायक वनसंरक्षक किंवा सहायक संचालकांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश वन व महसूल विभागाने दिल्याचे उच्चपदस्थ अधिकार्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.